नगर तालुक्यातील निंबळक, विळद येथे उड्डाणपूल होणार आहेत. तसेच देहरे येथे भुयारी मार्गाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी रेल्वे व्यवस्थापनाच्या विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करून काम लवकर मार्गी लावण्याचा सूचना दिल्याची माहिती युवा नेते अजय लामखडे, सुनील कोकरे यांनी दिली. निंबळक रेल्वे गेट नंबर ३० येथे उड्डाणपूल करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. उड्डाणपुलासाठी अजय लामखडे यांनी शिष्टमंडळासह दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांना निवेदन दिले होते.
त्याची दखल घेत रेल्वे मंत्रालयाकडून परिसरात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्याची माहिती लामखडे यांनी दिली. रेल्वेसंदर्भातील विविध समस्यांबाबत लोकप्रतिनिधींनी नगर येथील रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात पुणे वरिष्ठ विभागीय अभियंता देवेंद्रकुमार, मनमाड लाईन अभियंता दीपक कुमार, सहायक अभियंता एस. सुरेश, सहायक अभियंता त्रिवेदी, शाखा अभियंता अजय चोभे, स्टेशन मास्तर एन. पी. तोमर, निरीक्षक पी. जी. वारे, सुरक्षा इन्स्पेक्टर सतपाल सिंग, बेलापूर अभियंता विनयकुमार यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
बैठकीत नगर-पुणे इंटरसिटी लाईन, कोरोना काळात बंद केलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू करणे, विविध रेल्वेंना नगर स्थानकावर थांबा, राहुरी तालुक्यातील सडे, खडांबे येथे उड्डाणपूल, खडांबे येथील धार्मिक स्थळाला धक्का न लावता उड्डाणपूल बनविणे, निंबळक उड्डाणपूल, देहरे येथील अंतर्गत रस्ता खुला करण्याबरोबर विविध विषयांवर चर्चा झाली. दौंड-मनमाड दुहेरी लाईनचे काम प्रगतिपथावर आहे. नगर जिल्ह्यांतर्गत नऊ ठिकाणी उड्डाणपूल होणार आहेत. उड्डाणपुलाबाबत सर्वेक्षणाचे काम सुरू असून लवकरच कामांना सुरुवात होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
निंबळक येथे उड्डाणपुलाअभावी परिसरातील अनेक ग्रामस्थांचे हाल होत होते. त्यामुळे सरपंच प्रियंका लामखडे, तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने येथे उड्डाणपूल होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. देहरे येथील भुयारी मार्ग खुला करण्यासाठी सरपंच सुभद्रा कोकरे यांच्यासह ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यामुळे निंबळक, विळद, देहरे येथील रेल्वे उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम मार्गी लागणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.