नगर
राज्यातील मेंढपाळांच्या चराई कुरणाच्या बैठकीत मेंढपाळांच्या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी स्थायी समिती गठीत करण्याचे निर्देश राज्याचे महसूल व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी दिले.
वन क्षेत्रातील मेंढपाळांच्या चराई क्षेत्रासह विविध मागण्यांवर आज मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी या बैठकीला वन व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.मुनगंटीवार यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रमुख उपस्थिती होती. वनमंत्री मा.सुधीर मुनगंटीवार यांनी मेंढपाळांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने स्थायी समिती स्थापन करावी अशी सूचना दिली होती. त्यानुसार अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्येक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल या समितीमध्ये मेंढपाळांचे प्रतिनिधी तसेच आमदार श्री.पडळकर, माजी खासदार श्री.महात्मे, वन विभाग, वित्त विभाग, पशुसंवर्धन विभागाचे सचिव यांचा सहभाग असेल, असे आदेश महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
या बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री.राजेश कुमार , श्री संतोष महात्मे, श्री.आनंद बनसोडे यासह मेंढपाळांचे विविध जिल्ह्यातून आलेले प्रतिनिधी, महसूल व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर माजी खासदार डॉ विकास महात्मे, दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.
समितीच्या माध्यमातून चराई क्षेत्र म्हणून पडीक जमीन विकास करणे, वनक्षेत्रात चराईसाठी परवानगीची मागणी, प्रति मेंढी चरण्यासाठी वन वन विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या शुल्का बाबतचे प्रश्न सोडविणे, मेंढपाळांसाठी चरई भत्ता, विमा योजना, चराई क्षेत्रातील बेकायदेशीर अतिक्रमण हटविणे अशी कामे करेल.15 सप्टेंबर पर्यंत समितीचा संपूर्ण आराखडा आणि शिफारस करून समितीचे कामकाज सुरु केले जाईल असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.