महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र महाविकास आघाडीने निवडणूक जिंकण्याचा दावा केला आहे. आमच्या १७५ ते १८० जागा निवडून येतील असं महाविकास आघाडीने म्हटलं आहे. तर दुसरीकडे महायुतीनेही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाईल असा दावा केला आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आल्याचा दावा केला आहे. “महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे”, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.