नाशिक: एकलहरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर धनवटे यांना भागीदारीत बांधकाम व्यवसाय करण्याच्या आमिषातून वेळोवेळी भांडवलाच्या नावाखाली तब्बल १ कोटी ५९ लाख १६ हजार ५५० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मिलिंद बच्छाव आणि हर्षल बच्छाव (रा. जेलरोड) या बापलेकाविरोधात न्यायालयाच्या आदेशावरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१६ ते २०१९ या कालावधीत घडला.
फिर्यादी धनवटे यांची संशयित मिलिंद बच्छाव यांच्याशी वर्गमित्रामार्फत ओळख झाली होती. बच्छाव ठेकेदार असून शासकीय कामांचा ठेका घेत असे. त्याने भागीदारीत व्यवसाय करून नफा कमावण्याचे आमिष धनवटे यांना दाखविले. या व्यवसायाच्या बाबतीत त्यांच्यात चर्चा होऊन धनवटे यांनी बच्छाव यास आपला गाळा व्यवसायाच्या कार्यालयासाठी दिला. याच गाळ्याच्या पत्त्यावर संशयित मिलिंद बच्छाव याने बँकेत खातेही उघडले. शासकीय कामांचा ठेका मिळण्यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे दाखवावे लागते, असे बच्छाव याने सांगितले. त्यासाठी धनवटे यांनी पूर्ण भांडवल टाकण्याचा प्रस्ताव संशयिताने ठेवला. भागीदारीचा करार लिहून व नोंदविण्यास वेळ लागणार असल्याने संशयिताने स्वतःच्या नावावरील सुरज इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीच्या नावे भांडवलाची रक्कम भरावयास लावली. दुसऱ्या कंपन्यांकडून काम मिळाले असून, अनामत ठेव म्हणून चार वर्षांत तब्बल एक कोटीहून अधिक रक्कम संशयिताने धनवटे यांच्या विविध बँक खात्यांतून भागीदारीतील व्यवसायासाठी स्वीकारली. ही रक्कम संशयिताने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत मिळालेल्या त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुक्यातील रस्त्याच्या कामाच्या ठेक्यात गुंतवून ही कामे केली. शेगाव येथील पुलाचे मोठे कामही मिळाले. हे काम मोठे असल्याने या कामासाठी आवश्यक आधुनिक वाहने आणि यंत्रांची खरेदी देखील धनवटे यांनी दिलेले भांडवल आणि संशायीताने काही रक्कम स्वतः गुंतवून खरेदी केली.
माजी जि.प सदस्याची दीड कोटीची फसवणूक; बापलेकाविरोधात गुन्हा दाखल
- Advertisement -