Sunday, July 21, 2024

मा.नगराध्यक्ष विजय औटीविरोधात फसवणुकीचा गुन्हा : इतर दोघांचाही आरोपींमध्ये समावेश

मा. नगराध्यक्ष विजय औटीविरोधात फसवणुकीचा गुन्हा

इतर दोघांचाही आरोपींमध्ये समावेश

अस्तित्वात नसलेल्या अमार्टमेंटमधील शॉप व फ्लॅटची बनावट नोंद

पारनेर नगरपंचायतीने केला दाखल केला गुन्हा

पारनेर : प्रतिनिधी

अस्तित्वात नसलेल्या अपार्टमेंटमधील ३५ शॉप व २५ प्लॅट या मालमत्तेची नगरपंचायत दप्तरी नोंद करण्यासाठी बनावट दस्तऐवज संगनमताने तयार करून नगरपंचायतीची फसवणूक केल्याप्रकरणी पारनेर नगरपंचायतीचा माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विजय सदाशिव औटी याच्यासह अन्य दोघांवर पारनेर पोलीस ठाण्यात बुधवारी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात नगरपंचायतीचे कार्यालयीन अधिक्षक माधव गाजरे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे की, दि. २३नोव्हेंबर २०२३ रोजी मुख्याधिकारी विनय शिपाई यांनी भैरवी अपार्टमेंट या मिळकतीची स्थळ पाहणी करण्यासंदर्भात कर्मचारी छबन रघुनाथ औटी, राजेंद्र भाऊसाहेब पठारे, लिंबाजी रामभाऊ कोकरे, पंकज मेहेत्रे यांची नियुक्ती केली होती. या पथकाने पाहणी केली असता भैरवी अपार्टमेंट गट नंबर ३५४१/१,३५४२/२ मधील मिळकत २५९८ बी विंग मध्ये एकूण ४८ शॉप व २४ फ्लॅट अस्तित्वात आहेत. नगरपंचायत रजिष्टर नोंदीप्रमाणे ही इमारत अस्तित्वात आहे.
पारनेर गाव मिळकत गट नंबर ३५४४/१,३५४०/१,३५४४/२/व पारनेर नगरपंचायत मिळकत नंबर २५९४,२५९५,२५९६ ची नगरपंचायतच्या मागणी रजिष्टर नुसार पाहणी केली असता सदर मिळकतीमध्ये भैरवी अपार्टमेंट किंवा इतर नावाने कुठलीही इमारत अस्तित्वात नसून सदरची जागा मोकळी पडलेली दिसत आहे. त्याप्रमाणे सदरचा अहवाल मुख्याधिकारी यांना सादर केल्यानंतर चौकशीअंती नगरपंचायत हददीतील गट नंबर ३५५४/१,३५४०/१ व ३५४४/२ मिळकत नंबर २५९४,२५९५,२५९६ या जमीनीवर भैरवी अपार्टमेंट बिल्डिंग अ ब क अस्तित्वात नसतानाही नगरपंचायत मागणी रजिष्टर तथा नमुना नंबर ८ वर ३५ शॉप व २५ फ्लॅटची बेकायदशीर नोंद लावून सात बारा उताऱ्याचे कागदपत्रे तयार करून नगरपंचायत प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली आहे.
डिक्लरेशन दस्त सुची क्रमांक २, दस्त क्रमांक ५७१७/२०१५ दिनांक २८/१०/२०१५ मौजे पारनेर मिळकत गट नंबर ३५४४/१,३५४०/१,३५४४/२चे सात बाराचे उतारे व विजय सदाशिव औटी रा. पारनेर याचा दि.२१ नोव्हेंबर २०१५ प्रशासक, नगरपंचायत पारनेर यांना भैरवी अपार्टमेंटच्या नोंदी लावणेबाबत अर्ज दिलेला आहे.
सर्व कागदपत्रांचे आवलोकन करण्यात आले असता विजय सदाशिव औटी रा. पारनेर, संभाजी बबन मगर रा. पारनेर, विजया भागाजी नवले रा. पारनेर यांच्या वतीने विजय सदाशिव औटी याने भैरवी अपार्टमेंटच्या नोंदीसाठी अर्ज देऊन ग्रामअधिकारी तथा तलाठी एस.एन.मोरे यांनी सात बारा उतारे व आठ अ, तत्कालीन दुययम निबंधक यांच्याकडील नोंदीचे दस्त ऐवज सादर करून नोंदणी कर्मचारी नारायण माधव औटी यांना भैरवी अपार्टमेंट व त्यावरील ३५ शॉप व २५ फ्लॅट ही नगरपंचायतच्या मिळकत उतारा नमुना नंबर ८ ला नोंद लावल्याचे निदर्शनास आले आहे. या नोंदी केलेल्या मालमत्ता अस्तित्वात नसल्याने नोंदी लावण्यासाठी संगनमताने दस्तऐवज तयार करून दिशाभूल करून नगरपंचायतीची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समजून सवरून लोकसेवकाला खोटी माहिती पुरविणे, जे कथन अधिकथन कायद्यानुसार पुरावा म्हणून स्वीकार्य आहे, त्यात केलेेले खोटे कथन, अधिकथन खोटे असल्याचे माहीत असताना ते खरे म्हणून वापरणे, ठकवणूक करणे आणि मालमत्तेची सुपूर्दगी करण्यास अथवा मुल्यवान रोख बनविण्यास, त्यात फेरबदल करण्यास किंवा तो नष्ट करण्यास अप्रामाणिकपणे प्रवृत्त करणे, बनावटीकरण, ठकवणूक करण्यासाठी बनावटीकरण, बनावट असल्याचे माहीत असलेला दस्तऐवज खरा म्हणून वापरणे.

खा. नीलेश लंके यांचे सहकारी ॲड. राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विजय औटी हा सध्या पारनेर पोलीस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत आहे. या आगोदरही औटी याच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. झावरे हल्ला प्रकरणात जामीन मिळावा यासाठी औटी याने नगरच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र बुधवारीच न्यायालयाने औटी याच्यासह इतर दोघांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. झावरे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचे सबळ पुरावे असतानाच आता फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने औटी याचे पाय आणखीच खोलात गेले आहेत.

बनावट कागदपत्रे तयार करून नगरपंचायतीमध्ये नोंद करण्यात आलेल्या, प्रत्यक्ष अस्तीत्वात नसलेल्या मालमत्तेवर काही पतसंस्थांनी कर्ज दिले असून अशा पतसंस्थावंरही कारवाई करण्यात यावी. ज्यांच्याकडे खरोखर मालमत्ता आहे, अशा गरीब कर्जदारांना पतसंस्था चालक कर्ज देण्यास चालढकल करतात, बनावट कागदपत्रांच्या अधारे केवळ नोंदणी केलेली मालमत्ता तारण ठेउन कसे कर्ज वितरण केले याची चौकशी सहकार विभागाने करावी.

धोंडीबा शेटे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles