Monday, June 17, 2024

नगर मधील मल्टीस्टेट पतसंस्थेकडून ठेवीदारांची कोट्यावधींची फसवणूक,चेअरमनसह संचालकांवर गुन्हा दाखल

नगर शहरासह जिल्हाभरात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शाखा सुरु केलेल्या ध्येय मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाने जिल्हा भरातील अनेक ठेवीदारांकडून ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गोळा केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकवून ठेवत त्या परत न देता सर्व शाखा बंद करून ठेवीदारांची कोट्यावधींची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ध्येय मल्टीस्टेटच्या संचालक मंडळावर नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीसह ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ध्येय मल्टीस्टेटचे चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे (रा. पंचपीर चावडी, माळीवाडा), व्हाईस चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहररोड, सावेडी), संचालक व सीईओ राहुल बबन कराळे (रा. टोकेवाडी, ता.नगर), संचालक गणेश कारभारी कराळे (रा. आगडगाव, ता. नगर), विलास नामदेव रावते (रा.बोरुडेमळा, सावेडी), संचालिका पूजा विलास रावते (रा.बोरुडेमळा, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत ठेवीदार सौ. सुजाता संदीप नेवसे (रा.शिंदे मळा, सावेडी) यांनी गुरुवारी (दि. १६) दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी नेवसे यांनी ध्येय मल्टीस्टेटच्या पाईपलाईन रोडवरील शाखेत दि.१ डिसेंबर २०२२ रोजी १ वर्षाच्या मुदतीवर २ लाख रुपये ठेव ठेवलेली होती. त्यानंतर पुन्हा दि. १९ ऑगस्ट २०२३ रोजी १ लाख ७५ हजार रुपये १ वर्षाच्या मुदतीवर ठेव ठेवली होती. या ठेवीवर त्यांना १४.४० टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.

पहिल्या ठेवीची मुदत संपल्यावर त्यांनी ३ डिसेंबर २०२३ रोजी बालिकाश्रम रोडवरील मुख्य शाखेत चेअरमन विशाल भागानगरे यांची भेट घेवून ठेवीची रक्कम व्याजासह मागितली असता चेअरमन भागानगरे याने सध्या आमच्या कडे पैसे नाहीत, आम्ही जे कर्ज वाटप केलेले आहे, त्याची वसुली सुरु असून ते पैसे आल्यावर आम्ही तुम्हाला बोलावून घेवून तुमचे पैसे देवू असे सांगितले. त्यानंतर अनेकदा पाठपुरावा करूनही त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

काही दिवसांनी फिर्यादी नेवसे यांना समजले की ध्येय मल्टीस्टेटच्या सर्व शाखा बंद झाल्या आहेत. त्यानंतर त्यांनी संस्थेचे व्यवस्थापक भूषण शिंदे यांना फोन केला असता त्यांनी चेअरमन व संचालक १ -२ महिन्यांपासून संस्थेत आलेले नाहीत व त्यांचा संपर्कही होत नाही. त्यामुळे तुम्ही पोलीस ठाण्यात तक्रार करा. त्यानंतर नेवसे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात जावून तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांच्या प्रमाणेच जिल्हाभरातील अनेक ठेवीदारांच्या कोट्यावधींच्या ठेवी या संस्थेत अडकलेल्या असून त्या ठेवीदारांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत.

त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात जावून माहिती घेतल्यावर त्यांच्या प्रमाणे जिल्हा भरातील सुमारे ११२ ठेवीदारांनी तक्रारी केल्या असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार नेवसे यांची फिर्याद दाखल करण्यात आली.

या फिर्यादी वरून नेवसे यांच्या सह अन्य ११२ ठेवीदारांच्या ठेवी परत न देता त्यांची फसवणूक केल्या प्रकरणी चेअरमन व संचालकांवर भा.दं. वि. कलम ४२०, ४०६ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (एम पी आय डी)१९९९ चे कलम ३ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे हे करीत आहेत.

गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने तपास

लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होणार

ध्येय मल्टीस्टेट या संस्थेच्या नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात गावागावात शाखा होत्या. त्या सर्व शाखांच्या ठेवीदारांचा विचार करता ठेवीदारांची संख्याही मोठी आहे. आणि अडकलेल्या ठेवींच्या रकमाही अनेक कोटींमध्ये आहेत. दाखल झालेला गुन्हा व त्यातील ठेवीदारांची संख्या आणि फसवणूक झालेली रक्कम सध्या जरी कमी दिसत असली तरी या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने सदरचा गुन्हा लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

शेतकरी, शिक्षक, व्यावसायिकांचा ठेवीदारांत समावेश

संस्थेने शहराबरोबरच ग्रामीण भागातही शाखांचे जाळे पसरवलेले होते. प्रत्येक ठिकाणी विविध कार्यक्रम घेवून ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारची आमिषे दाखविण्यात आली. इतर बँका व पतसंस्थांच्या पेक्षा ठेवीवर अधिक व्याजदर देण्याचे जाहीर केले होते. त्यांच्या या अमिषाला भुलून अनेक ठेवीदारांनी संस्थेत ठेवी ठेवल्या.

त्या मध्ये मजुरी काम करणाऱ्या महिला, शेतकरी, शिक्षक, गावागावातील किराणा दुकानदार तसेच इतर व्यावसायिक व छोटे मोठे उद्योजक यांचा समावेश आहे. काही महिलांनी तर पैशांची बचत करण्यासाठी कुटुंबियांना माहित न होता ५ हजारांपासून २५ – ३० हजारांपर्यंतचे पैसे या संस्थेत ठेवलेले होते. असे काही ठेवीदारांनी पोलिसांना सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles