Saturday, March 22, 2025

आजपासून राज्यभर दूध उत्पादकांचे आंदोलन,दुधाला प्रतिलिटर चाळीस रुपये भाव देण्याची मागणी

दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार दि. 28 जूनपासून राज्यात अधिक संघटितपणे आंदोलन सुरू होत आहे. किसान सभा व समविचारी विविध शेतकरी संघटना, कार्यकर्ते व आंदोलकांमध्ये समन्वय स्थापित करून आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आली आहे.
दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. वर्षभर सातत्याने तोटा सहन करावा लागल्याने उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी असून राज्यात या नाराजीचा उद्रेक आंदोलनांच्या निमित्ताने पुढे येत आहे. उत्स्फूर्तपणे दूध उत्पादकांनी ठिकठिकाणी रास्ता रोको, उपोषणे, निदर्शने सुरू केली आहेत. सरकारने या सर्व आंदोलनांची दखल घ्यावी व दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती सरकारला करत आहे.

गेले वर्षभर दूध दराबाबत शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. प्रतिलिटर 10 ते 15 रुपयांचा तोटा सहन करून उत्पादक शेतकरी दूध घालत आहेत. उत्पादनातील वाढता तोटा सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. राज्य सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान 40 रुपये दर द्यावा, बंद केलेले दूध अनुदान पुन्हा सुरु करावे, वाढता उत्पादन खर्च व तोटा पाहता अनुदानात वाढ करून ते प्रतिलिटर 10 रुपये करावे तसेच अनुदान बंद काळात दूध घातलेल्या शेतकर्‍यांना या काळातील अनुदान द्यावे या मागण्या दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे.

याचबरोबर दीर्घकालीन दूध धोरण तयार करण्याची नितांत आवश्यकता असून दुधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा यासाठी उसाप्रमाणे दुधालाही एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना करावी, पशुखाद्य व पशु औषधांचे दर नियंत्रित करावेत, खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल, असा लुटमार विरोधी कायदा करावा, दूध भेसळ रोखावी, अनिष्ट ब्रँड वॉर रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरणाचा स्वीकार करावा, मिल्कोमीटर व वजन काट्यात होणारी दूध उत्पादकांची लुटमार थांबवण्यासाठी तालुकानिहाय स्वतंत्र तपासणी निरीक्षकांची नियुक्ती करावी, शासकीय अनुदानातून पशु आरोग्य विमा योजना सुरू करावी आदी मागण्या संघर्ष समितीच्यावतीने डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, सतीश देशमुख, अशोक ढगे, ज्योतीराम जाधव, नंदू रोकडे, दादा गाढवे, राजकुमार झोरी, श्रीकांत करे, रामनाथ वदक, दीपक वाळे, मंगेश कान्होरे, दीपक पानसरे, सुहास रंधे, अमोल गोर्डे, रवी हासे, दीपक काटे, केशव जंगले आदिंनी केल्या आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles