गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील 105 विद्यार्थ्यांनींना जेवणातून विषबाधा झाली आहे. या विद्यार्थींनींना धानोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील 15 ते 20 मुलींना प्राथमिक उपचारानंतर सुटी दिली तर 73 विद्यार्थ्यांनींची प्रकृती गंभीर असल्यामुळे गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनींवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.
सोडे येथील मुलींच्या आश्रमशाळेतील विद्यार्थीनींनी दुपारी 12 वाजताच्या सुमारास बटाटा-कोबीची भाजी, वरण आणि भात असे जेवण देण्यात आले. हे जेवण जेवल्यानंतर काही वेळाने मुलींना उलट्या आणि हगवण सुरू झाली. तेव्हा तेथील शिक्षकांनी दुपारी तीन वाजताच्या सुमारास सहा ते सात मुलींना धानोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असतानाच आणखी मुलींना मळमळ, उलट्या आणि हगवणीचा त्रास सुरू झाला. त्यांना सुद्धा रुग्णालयात दाखवणे सुरू झाले. सायंकाळपर्यंत 105 मुलींना विषबाधा झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.