अहमदनगर -एक कोटीच्या लाच प्रकरणातील संशयित आरोपी कार्यकारी अभियंता गजानन ऊर्फ गणेश लक्ष्मण वाघ याच्या पुणे येथील घराची (फ्लॅट) नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने झडती घेतली. त्याच्या घरात 15 तोळे सोने, अडीच किलो चांदी व 80 हजारांची रोकड आढळून आली आहे. पथकाने पंचनामा केला असून सर्व मालमत्ता अधिकृत आहे की अनधिकृत, याबाबतची तपासणी केली जाणार आहे. अभियंता वाघ सध्या पोलीस कोठडीत असून, गुरूवारी आणि शुक्रवारी त्याच्या पुणे येथील घराची झडती घेण्यात आली. आज (शनिवारी) वाघ याच्या धुळे येथील घराची झडती घेण्यात येणार असल्याचे नाशिक लाचलुचपत विभागाकडून सांगण्यात आले.
नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगर शहराजवळ सापळा रचून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अहमदनगर उपविभागाचा सहाय्यक अभियंता अमित किशोर गायकवाड याला एक कोटी रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याने सदरची लाच स्वतःसाठी तसेच तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या करीता स्वीकारली असल्याचे सिध्द झाले. त्यानुसार दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी नाशिक जवळ अभियंता वाघ याला ताब्यात घेत अटक केली.अकरा दिवसानंतर तो पथकाच्या सापळ्यात अडकला. धुळे येथे असलेली काही कागदपत्रे घेण्यासाठी तो मुंबईहून धुळ्याच्या दिशेने जात होता. त्याची माहिती मिळताच नाशिकजवळ त्याला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने 19 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत वाघ याच्याकडून फारशी माहिती अद्याप मिळालेली नाही. तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत व त्यांच्या पथकाने वाघ याच्या आवाजाचे व हस्ताक्षराचे नमुने घेतले. गुरूवारी आणि शुक्रवारी त्याच्या पुणे येथील घराची झडती घेण्यात आली. त्यात 15 तोळे सोन्याचे दागिने, अडीच किलो चांदी तसेच, 80 हजारांची रोकड आढळून आली आहे. आज (शनिवारी) धुळे येथील घराची झडती घेण्यात येणार आहे.
वाघ याचे बुलढाणा येथे घर असून तेथे त्याचे नातेवाईक राहत आहे. तसेच त्याचे छत्रपती संभाजीनगर येथेही घर असून ते त्याने भाड्याने दिले आहे. आज शनिवारी धुळे येथील घराची झडती घेण्यात येणार आहे. दरम्यान, त्याची स्थावर मालमत्ता किती आहे, याची माहिती अद्यापही लाचलुचपत विभागाला मिळालेली नाही. यासंदर्भात लाचलुचपत विभाग पत्र व्यवहार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.