लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवत संशयित टोळीने एकाची १ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथे घडली आहे. या प्रकरणी नेवासा तालुका पोलीस ठाण्यात ४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत गीताराम भागाजी अनाप (रा. पिचडगाव, ता. नेवासा) या शेतकऱ्याने नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा गणेश याच्या लग्नासाठी मुलगी पाहण्याचे काम सुरु होते. अशातच दि.२२ डिसेंबर रोजी नेवासा तालुक्यातील उंदीरवाडी येथील अनिल क्षिरसागर याच्या मध्यस्थीने साहेबराव माधव डांगे (रा.कोऱ्हाळे, ता. राहाता),मंगल बबन ठोंबरे (वैजापूर, संभाजीनगर), सुलोचना आकाश कोडापे (चंद्रपूर) हे आले व त्यांनी तुमच्या मुलाचे लग्न जमवून देतो असे अमिष दाखवत त्यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये घेतले.
त्यानंतर ते आम्ही मुलीला घेवून परत येतो असे सांगून तेथून निघून गेले. पुन्हा आलेच नाहीत. त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली असे लक्षात आल्यावर त्यांनी रविवारी (दि.२४) नेवासा पोलिस ठाण्यात येवून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी चौघांच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.