महाराष्ट्राला आपल्या अदांनी घायाळ करणाऱ्या गौतमी पाटीलने यंदा दहीहंडीनिमित्ताने मुंबई आणि ठाण्यात हजेरी लावली होती. यावेळी तिच्या डान्स, अदांबरोबर एका गोष्टीची सर्वाधिक चर्चा रंगली होती. गौतमीने मागाठाणे येथील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या भव्य दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी गौतमीचे जंगी स्वागत करण्यात आले. दहीहंडी राहिली बाजूला; पण गौतमीला पाहण्यासाठीच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. पाव्हणं जेवलं काय, तुझ्यासाठी आले वनात कान्हा रे अशा गाण्यांवरील गौतमीचे जोरदार ठुमके, दिलखेचक अदा, चेहऱ्यावरील उत्साह पाहून गोविंदांनी एकच जल्लोष केला. गौतमीच्या जोरदार ठुमक्यांबरोबर तिच्या आणखी एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
गौतमीच्या डान्सबरोबर यंदा तिच्या ब्लाऊजनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गौतमीने खास दहीहंडी सेलिब्रेशनसाठी एक आकर्षक ब्लाऊज परिधान केला होता. गौतमीने राधा-कृष्णाच्या फोटोनं बनविलेला खास पिवळ्या रंगाचा ब्लाऊज आणि लाल रंगाची नऊ वारी साडी परिधान केली होती. तिचा हा लूक आता चांगलाच चर्चेत आला आहे. खासकरून तिचा ब्लाऊज आकर्षणाचा विषय ठरला.