अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ आणि त्यांच्या पत्नी उपक्रमशील शिक्षिका संजना चेमटे-अडसूळ यांनी मुलीच्या लग्नात दहा शाळांच्या ग्रंथालयास विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची एक हजार पुस्तके भेट दिली. पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील या शिक्षक दांम्पत्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक असलेले अडसूळ यांची मुलगी स्नेहलचे नुकतेच शहरातील द्वारका लॉन येथे लग्न समारंभ पार पडले. ग्रंथालयाची ही पुस्तके शिक्षण संचालक दिनकर टेमकर, राज्याचे शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे, जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या हस्ते संबंधित शाळेच्या शिक्षकांकडे ग्रंथालयास वितरीत करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजीनगर डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. विशाल तायडे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी अरुण धामणे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोद मोरे, माजी शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणात लोकसहभागातून विविध सुविधा मिळण्यासाठी मिशन आपुलकी हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन उपस्थितांना पर्यावरण संवर्धनासाठी झाडांची रोपे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सुमारे एक हजार रोपे वाटप करण्यात आली. विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेवरही अडसूळ परिवाराने समाजात वाचनाचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला होता.
विवाहात राबविलेल्या या सामाजिक उपक्रमाचे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे, महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार निलेश लंके, मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करणारे अमेरिकेतील ग्लोबलनगरी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किशोर गोरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, आदर्श गाव हिवरे बाजारचे प्रसन्ना पवार, उपवनसंरक्षक सुवर्णाताई माने, विभागीय वन अधिकारी सचिन कंद, माजी शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, माजी शिक्षणाधिकारी पांडुरंग मगर यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
तुकाराम अडसूळ यांनी गावातील मंदिराच्या बांधकामासाठीही मदत दिली. यावेळी राज्यातील व जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील उपस्थित मान्यवर, डायटचे अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पत्रकार, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ, सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी, पर्यावरण मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम अडसूळ व अनिल शिंदे यांनी केले.
नगर जिल्ह्यातील एक विवाह असाही..! अनेक शाळांना शेकडो पुस्तकांची भेट, रोपं देऊन उपस्थितांचा पाहुणचार
- Advertisement -