Thursday, March 27, 2025

सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ द्या !मुदतवाढ न दिल्यास संसदेबाहेर आंदोलन

अहिल्यानगर : प्रतिनिधी सोयाबीन खरेदीसाठी किमान एक महिन्यांची मुदतवाढ मिळावी ही आमची मागणी असून त्यासंदर्भात आपण संबंधित मंत्र्यांची भेट घेउन निवेदन सादर करणार आहोत. मागणीची दखल न घेतली गेल्यास सोमवारी संसदेबाहेर या प्रश्नावर आंदोलन करू असा इशारा खा. नीलेश लंके यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला.
संसदेच्या अधिवेशनामध्ये नवी दिल्लीमध्ये असलेल्या खा. नीलेश लंके यांनी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पवार यांच्या निवसासस्थानाबाहेर खा. लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खा. लंके म्हणाले, सोयाबीन खरेदीसाठी शासनाच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ भेटलीच पाहिजे. यासंदर्भात संबंधित मंत्रीमहोदयांशी आपण पत्रव्यवहार करणार आहोत.
आजही सोयाबीन खरेदी केंद्रांवर शेतकरी विविध वाहनांमधून सोयाबिन घेउन आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आठ दिवसांची मुदत वाढ देऊन काही होत नाही. किमान एक महिन्याची मुदत वाढ द्यायला हवी. शेतकऱ्यांना द्यायचे असेल तर मोकळया मनाने दिले पाहिजे. आठ दिवस मुदतवाढ दिल्यानंतर त्याची माहीती होण्यासाठी दोन दिवस जातात. मग चार पाच दिवसांत काय होणार आहे ? असा सवाल खा. लंके यांनी केला.

शेतकरी सुखी तर देश सुखी !

सोयाबीन खरेदी झाली नाही तर शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान होणार आहे. व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने सोयाबीन विकावे लागणार आहे. त्यामुळेच मी मंत्र्यांना पत्र देउन या प्रश्नाकडे लक्ष वेधणार आहे. शेतकरी हा महत्वाचा आहे. तो अन्नदाता आहे. शेतकरी सुखी राहीला तर देश सुखी राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी, शेतकऱ्यांबरोबर राहीले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. संसदेत आल्यानंतर मी पहिला प्रश्न दुध, कांदा, सोयाबीनचा मांडला होता. यावेळच्या अधिवेशनातही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मागण्या केल्या असल्याचे खा. लंके यांनी सांगितले.

संसदेसमोर आंदोलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गेल्या अधिवेशनात तुम्ही आक्रमक दिसत होता. या प्रश्नावर काय भूमिका घेणार या प्रश्नावर बोलताना सोयाबीन खरेदीस मुदतवाढ मिळाली नाही तर संसदेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करणार असल्याचे खा. लंके यांनी जाहिर केले.

त्यांना दूर ठेवण्यात कोणाला स्वारस्य ?

व्ही.राधा हे अतिशय चांगले अधिकारी आहेत. त्यांनी केंद्र सरकारमध्ये अनेक मंत्र्यांसोबत काम केलेले आहे. त्यांना दूर ठेवण्यात कोणाला स्वारस्य आहे, कशासाठी आहे हे सर्वांना माहीती असल्याचे खा. लंके यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना सांगितले.

शिक्षकांच्या प्रश्नासाठी अर्थमंत्र्यांना भेटणार

सेवा निवृत्त शिक्षकांचे काही प्रश्न आहेत. या प्रश्नांसदर्भात विशेषतः अर्थमंत्री यांच्याशी मी पत्रव्यवहार केला आहे. या प्रश्नासंदर्भात निर्मला सितारमण यांच्यासमवेत बैठक घेण्यासंदर्भात आपण शरद पवार यांची भेट घेतल्याचे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना खा. लंके यांनी सांगितले.

मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येईल

जायकवाडी प्रकल्पाअंतर्गत पैठण, शेवगांव या भागातील मच्छिमार बांधवांचा प्रश्न आहे. दरवष या मच्छिमार बांधवांवर टांगती तलवार असते. इको सेंसेटिव्ह झोन असतानाही तिथे सौर प्रकल्प उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. हा प्रकल्प झाल्यास लाखो लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यासंदर्भातही संबंधित मंत्र्यांना मी भेटणार असल्याचे खा. लंके यांनी सांगितले.

नगर-सुपा मार्गे रेल्वेमार्गासाठी आग्रही

रेल्वेच्या मागणीसंदर्भात मागील अधिवेशनादरम्यान आपण रेल्वे मंत्र्यांना निवेदन सादर केले आहे. त्यापूर्वीही या मागणीसाठी पत्रव्यवहार केला होता. संभाजीनगर, वाळुंज, देवगड, शिड, शनी शिंगणापुर, अहिल्यानगर, सुपा-पारनेर एमआयडीसी, रांजणगाव एमआयडीसी व पुणे या मार्गावर रेल्वे सेवा हवी अशी आमची मागणी असून त्यासाठी आम्ही आग्रही आहोत.

खासदार नीलेश लंके
लोकसभा सदस्य

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles