कांद्याच्या दरात वाढ झाल्यामुळे शेतकरी खूश आहेत. परंतु वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाल्या झळ पोहोचत आहे. सध्या कांद्याचे दर ४७ रुपये किलोवर गेले आहेत. यामुळे कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. एक -दोन दिवसापूर्वी कांद्याच्या दरात ५७ टक्क्यांची वाढ झाल्याचा अहवाल आला होता.
दरम्यान ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार,वर्षभरापूर्वी या कालावधीत कांद्याची सरासरी किरकोळ किमत ३० रुपये प्रति किलो होती. देशात सध्या कांद्याचे दर ४७ रुपये प्रति किलो झालाय. त्यामुळे कांद्याच्या किमती कमी करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सरकारने बफर स्टॉकमधून कांद्याची किरकोळ बाजारात २५ रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने विक्री करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. सामान्य ग्राहकांना याचा फायदा होणार असला तरी शेतकऱ्यांना मात्र याचा फटका बसणार आहे
हवामानाशी संबंधित कारणांमुळे खरीप कांद्याच्या पेरणीला उशीर झाल्यामुळे पीक कमी झाले. हे पीक बाजारात यायला उशीर झाला. सध्या खरीप कांद्याची आवक सुरू व्हायला हवी होती, मात्र तसे झाले अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. तर साठवलेला रब्बी कांदा संपल्याने आणि खरीप कांद्याची आवकला उशीर झाल्यामुळे पुरवठ्याची स्थिती बिकट झालीय. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात भाव वाढत आहेत.
यामुळे ग्राहकांना कांदा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार बफर स्टॉकमधून कांद्यांची विक्री करत आहे. ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टच्या मध्यापासून बफर स्टॉकमधून कांदे उपलब्ध करून दिला जातोय. किंमती वाढू नयेत आणि ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी आम्ही किरकोळ विक्री वाढवत असल्याचं त्यांनी सांगितले.
तर मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ज्या राज्यांमध्ये किंमती झपाट्याने वाढत आहेत, तेथे घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारांमध्ये बफर स्टॉकमधून कांद्याचा पुरवठा केला जातोय. दरम्यान ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून २२ राज्यांतील विविध ठिकाणी बफर स्टॉकमधून सुमारे १.७ लाख टन कांद्याचा पुरवठा करण्यात आलाय.