राज्य सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्री केल्यानंतर या दोन उपमुख्यमंत्री नियुक्तीच्या अनुषंगाने आता आमच्या गावच्या विकासासाठी दोन उपसरपंच हवेत, असा ठराव सातारा जिल्ह्यातील सोनापूर (ता. सातारा) ग्रामपंचायतीने मासिक सभेत केला आहे. याबाबतचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.
राज्याच्या राजकारणाचे गावपातळीवर प्रतििबब उमटल्याचे हे उदाहरण आहे, परंतु, गावाला दोन उपसरपंच मिळण्यासंदर्भातील ठराव नोंदवून घेण्यास ग्रामसेवकाने नकार दिला आहे. तर, या ठरावाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे, अशाही मागणीचा ठराव ग्रामपंचायत सदस्यांनी केला असल्याने आता या प्रकरणात काय कार्यवाही होते, निर्णय होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. सोनापूरच्या सरपंच सुनंदा खरात साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या की, सोनापूर ही ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत आहे.
गावच्याअंतर्गत निवडुंगवाडी हे गाव सामील असून, हे गाव सोनापूरपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. या ग्रामपंचायतीमध्ये नऊ सदस्य आहेत. यामध्ये सरपंचपद हे आरक्षित महिला आहे, तर उपसरपंचपदही काही महिन्यांपासून रिक्त आहे. मात्र आता गावाची भौगोलिक रचना विचारात घेत दोन उपसरपंचपदे निर्माण करावी, असा ठराव मासिक सभेत करण्यात आला आहे. परंतु, असा ठराव लिहिण्यास ग्रामसेवकांनी नकार दर्शवला आहे. महाराष्ट्र राज्याला दोन उपमुख्यमंत्री चालत असतील तर गावच्या विकासकामांना गती मिळण्यासाठी गावासाठी दोन उपसरपंचपदे असावीत असे सदस्यांचे मत आहे. दोन उपसरपंच असतील तर गावाच्या विकासाला चालना मिळेल, तरी आमच्या या ठरावाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी करणारा ठरावही ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. त्याची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याचे सरपंच खरात यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतीच्या या ठरावाचे जोरदार समर्थन करत जिल्हाधिकाऱ्यांकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.