नाशिक : ग्रामविकास विभागाच्या मान्यतेनुसार २५ ते ३० जुलै यादरम्यान घेण्यात आलेला ग्रामसेवक पेसा व नॉन पेसा पदाच्या परीक्षेचा निकाल ‘आयबीपीएस’कडून प्राप्त झाल्यानंतर शनिवारी (ता. १४) प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आला आहे.
निकाल नाशिक जिल्हा परिषदेच्या https://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.जिल्हा परिषदेने ५ ऑगस्ट २०२३ ला प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील ग्रामसेवक पेसा व नॉन पेसा या पदांकरिता आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन, मुंबई) या संस्थेतर्फे ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी एकूण ११ हजार ७२८ उमेदवारांनी अर्ज केले होते. यातील चार हजार ९३९ उमेदवारांनी परीक्षा दिली. यातील ४५ टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच ९० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या एक हजार ९१३ परीक्षार्थींचा निकाल जाहीर झाला.
जिल्हाधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली तसेच जिल्हा परिषदेच्या परीक्षेकरिता ‘नोडल अधिकारी’ तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी व जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत ‘आयबीपीएस’कडून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी भरारी पथकप्रमुख प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे व प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, प्रत्येक परीक्षा केंद्राकरिता ‘व्हेन्यू ऑफिसर’ व सहाय्यक अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या, अशी माहिती परदेशी यांनी दिली.