Tuesday, March 18, 2025

ग्रामसभेत मद्यविक्रीचा परवाना देणारे ग्रामसेवक निलंबित! जि. प. ग्रामपंचायत विभागाची कारवाई

नाशिक- पिंपळद (ता. चांदवड) येथील ग्रामसेवक देवीदास आनंदा पाटील यांना ग्रामसभेत ठराव झालेला नसताना गावात बिअर बार, मद्यविक्री परवाना देणे भोवले आहे. कागदोपत्री ग्रामसभा दाखवून हा परवाना झाल्याचे सिद्ध झाल्याने ग्रामपंचायत विभागाने पाटील यांच्या निलंबनाचे आदेश काढले. संबंधित गावातील सरपंचांवर अपात्रता कारवाईचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे

गेल्या आठवड्यात दोन ग्रामसेवकांना निलंबित केलेले असताना या आठवड्यात ही कारवाई झाल्याने ग्रामसेवकांमध्ये एकच खळबळ उडाली. सरपंचांबाबत विभागीय आयुक्तांकडून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. पिंपळद येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक पाटील आणि सरपंचांनी संगनमताने ग्रामसभेत ठराव झालेला नसताना गावात बिअर बार, मद्यविक्री परवाना दिल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने चांदवड गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून १५ फेब्रुवारीला अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या आधारे विभागीय आयुक्तांकडून परवानगी मिळाल्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली.यात, ग्रामसभेत प्रत्यक्षात असा ठराव झालेला नसताना ग्रामसेवक व सरपंचांनी कागदोपत्री हा ठराव झाल्याचे दाखवत ठराव पारित केला अन परवाना दिल्याचे निष्पन्न झाले. बिअर बार आणि मद्यविक्रीचा परवाना देण्याचा ग्रामसभेतील ठराव हा बनावट असल्याचे आणि प्रत्यक्ष ग्रामसभेत त्याबाबतचा विषयच झाला नसल्याचे नमूद असल्याचे सिद्ध झाले.

त्यावर प्रशासनाने ग्रामसेवक पाटील यांनी केवळ कागदोपत्रीच हा निर्णय घेतल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. सरपंचांबाबत विभागीय आयुक्तांकडून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles