राज्यातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झालं. महायुती आणि महाविकास आघाडी अशी ही निवडणूक झाली. शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि काँग्रेसने महायुतीला जोरदार टक्कर दिली नसल्याचं दिसत आहे.
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत 750 हून अधिक जागा जिंकत भाजपाने राज्यात क्रमांक एकचे स्थान पटकाविले आहे. मात्र हा दावा खोटा असल्याचे सांगत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीनेच बाजी मारल्याचे म्हणले आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डाजी यांच्या मार्गदर्शनात भाजपाची संपूर्ण देशात यशस्वी घौडदौड सुरू आहे. ‘पंचायत टू पार्लमेंट’ केवळ आणि केवळ आणि चप्पा-चप्पा भाजपा आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत 750 हून अधिक जागा जिंकत भाजपाने राज्यात क्रमांक एकचे स्थान पटकाविले आहे, असा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे.
“राज्यातील महायुती सरकारच्या कामगिरीला सुद्धा हा राज्यातील जनतेने दिलेला सुस्पष्ट कौल आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा मोठे यश या निवडणुकीत मिळाले.महायुतीने एकत्रितरित्या 1400 हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय संपादन केल्याचे ते म्हणाले.
मात्र कॉंग्रेसने हा दावा खोडून काढत या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आतापर्यंत ५८९ ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकवला आहे तर महाविकास आघाडीने एकूण १३१२ ग्रामपंचायतीत विजय मिळवत राज्यात आघाडी घेतल्याचा दावा केला आहे. तसेच भाजपने केलेले दावे साफ खोटे असून हिम्मत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात असे आव्हानही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
“राज्यातील बहुतांश बाजार समित्यांवर काँग्रेस व मित्रपक्षांचाच विजय झालेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतही राज्यातील जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे पण ‘खोटे बोल पण रेटून बोल’ अशा पद्धतीने ते विजयाचा खोटा दावा करत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
तसेच नागपूर जिल्ह्यातही भाजपाचा सुपडासाफ झालेला आहे, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील आतापर्यंत २३ ग्रामपंचयातीवर काँग्रेसने दणदणित विजय मिळवला असून भाजपाच्या वाट्याला फक्त २ ग्रामपंचायती आल्या आहेत तरीही ते स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत.. असे म्हणत नाना पटोले भाजपच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे.