सोमवारपासून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ बंद पडल्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नगरसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागला.
सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदांच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 3 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेला आहे. या निवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे.
निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा कालावधी 16 ते 20 ऑक्टोबर 2023 असा असून, राज्यभरात आज (16 ऑक्टोबर) पासून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ (वेबसाईट) बंद पडल्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता आले नाही. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली असताना निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने एकच गोंधळ उडाला.