Thursday, March 20, 2025

तरुणांनी नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

कृषी उत्पादन वाढविण्यासाठी तरुणांची नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

लोणी येथे शिवार फेरी, कृषी प्रदर्शनाचे आयोजन

शिर्डी, ३१:- सध्या नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित होत असून कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तरुणांनी नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

प्रवरा कृषी शास्त्र संस्था (लोणी), कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर (पायरेन्स) आणि शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने लोणी येथे आयोजित शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाप्रसंगी ते बोलत होते. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या १२४ व्या जयंती व शेतकरी दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, राहुरी कृषी विद्यापीठाचे कृषी विस्तार संचालक डॉ. जी. के. ससाणे, प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे पाटील, अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे पाटील आदी उपस्थित होते.

जैविक तंत्रज्ञानाच्या आधारावर पिकविलेला भाजीपाला भाविकांना उपलब्ध करून देण्यासाठी शिर्डीत कृषी मालाचे विक्री केंद्र सुरू करता येईल. त्यासाठी जागाही उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की, शेतीत जैविक खतांचा वापर वाढत आहे‌. शेतकरी जागृत झाला आहे. शेतात महिलांचा सहभाग वाढला आहे. अशा परिस्थितीत नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कृषी महाविद्यालय व कृषी संशोधन केंद्र शेतकऱ्यांसाठी आदर्श असले पाहिजे. कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचे काम या संस्थांनी करावे.

शेती उत्पादनाबरोबर कृषी पणन बळकट झाले पाहिजे. कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी आणि समूह शेतीचा प्रयोग झाला पाहिजे. शेतकरी प्रयोगशील आहे. त्याला संधी उपलब्ध करून द्यायला हवी. मागील काही वर्षांत भारत सरकारने शेती क्षेत्रात १ लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. शेती आता पारंपरिक राहिली नसून शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आले आहे. फवारणीसाठी ड्रोनचा वापर होत आहे‌. कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रात वापर होत आहे. दूधाचे उत्पादन दिवसेंदिवस वाढत जाणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाकडे कल वाढतो आहे. हे पाहता राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याची गरज आहे. शिवार फेरी, कृषी प्रदर्शनसारख्या उपक्रमातून कृषी संशोधनास चालना मिळणार आहे, असेही पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी विषयक उपक्रम व योजनांची माहिती देणाऱ्या घडी पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

बँकाँक नयेथे जाऊन बदलत्या कृषी तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण घेतलेल्या ३० विद्यार्थ्यांचा यावेळी प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. राहुरी कृषी विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त तन्मय शिंपी व फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद प्राप्त करणाऱ्या प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या संघाचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी काढण्यात आलेल्या शिवार फेरीत प्रवरा कृषी शास्त्र संस्था, प्रवरा कृषी महाविद्यालय, प्रवरा जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय (खडकेवाके), कृषी तंत्रनिकेतन (लोणी), पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालयाच्या (लोणी, फत्त्याबाद व अळकुटी) विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. परिसरातील शेतकरीही मोठ्या संख्येने शिवार फेरीत सहभागी झाले होते. कृषी प्रदर्शनात राहुरी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व विविध कृषी महाविद्यालयांचे नवीन कृषी तंत्रज्ञानाचे माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. त्याबरोबर स्थानिक विक्रेत्यांचे कृषी माल, यंत्रसामग्री विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते.

प्रास्ताविकात डॉ. उत्तमराव कदम यांनी उपक्रमाची माहिती दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles