गणेशोत्सवापूर्वी अहमदनगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
पुणे दि.२८- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गणेशोत्सवापूर्वी अहमदनगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत आणि रस्त्यावरील सर्व खड्डे तातडीने दुरुस्त करावे, असे निर्देश राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे मनमाड रस्त्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, भारतीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक अनिल गोरड, धनु झोडगे (दुरदृश्य प्रणालीद्वारे) आदी उपस्थित होते.
मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो आहे. पावसाळ्यापूर्वी करावयाची दुरुस्तीची कामे वेळेवर करण्यात आली नाही. महामार्गाच्या थांबलेले काम पूर्ण करण्यासाठी नवा कंत्राटदार निवडतांना त्याची काम करण्याची क्षमता लक्षात घ्यावी. खड्डे बुजविण्यासाठी एकाचवेळी एकापेक्षा अधिक संस्था नियुक्त करून तातडीने महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी. प्रशासनाचे आवश्यक तेथे सहकार्य घ्यावे. रस्ता त्वरित वाहतूक योग्य करण्यात यावा.
एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी त्वरित महामार्गाला भेट देऊन तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करावी. वाहतूक वळविण्यासाठी वाहतूक मार्शल पुरेशा प्रमाणात नियुक्त करावे. नगर-छत्रपती संभाजी नगर, श्रीरामपूर-नेवासे मार्गावरील खड्डेदेखील बुजविण्यात यावे. दुरुस्तीची कामे करतांना आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्यात यावी. कोल्हार येथील पुलाच्या दुरुस्तीचे आणि रुंदीकरणाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, असे निर्देश विखे पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी श्री.सालीमठ म्हणाले, शिर्डी ते अहमदनगर रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे आहेत.सण-उत्सवाचे दिवस असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे महामार्गावरील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. त्यासोबतच कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी आणि रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी गांभीर्याने कार्यवाही करावी.
रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात मार्गावरील सर्व खड्डे बुजविण्यात येतील असे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.