विधानसभा निवडणूक निकालानंतर दोन आठवड्यांनी राज्यामध्ये महायुतीचं नवं सरकार स्थापन झालं. नवं सरकार येताच शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. जळगावमधील शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. गुलाबराव देवकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. त्यामुळे ते लवकरच हातामध्ये घड्याळ घालणार असल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अजित पवार गटाला काही प्रमाणात बळ मिळणार आहे. याबाबत गुलाबराव देवकर यांनी देखील दुजोरा दिला आहे. देवकर यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. दोन दिवसांत अजित पवारांची भेट घेऊन कार्यकर्त्यांसह अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे गुलाबराव देवकर यांनी सांगितले