बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प किंवा आता जो बायडेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या वेळी या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. या सर्वांशी संवाद साधताना एका महिलेची उपस्थिती नक्कीच होती. ही महिला केवळ पीएम मोदींबरोबरच उपस्थित नव्हती, तर या दिग्गजांना त्यांनी मोदींचा मुद्दाही समजावून सांगितला. इतकंच नाही तर ही महिला पंतप्रधान मोदींच्या सर्व विदेश दौऱ्यांमध्ये दिसल्या. गुरदीप कौर चावला असं या महिलेचे नाव आहे. गुरदीप कौर या सुप्रसिद्ध इंटरप्रिटर आहेत. त्या पंतप्रधानांच्या भाषणाचे भाषांतर करतात आणि सर्व दिग्गज राज्यप्रमुखांना तसेच सर्वोच्च नेत्यांना समजावून सांगतात.
गुरदीप या अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीमधल्या यशस्वी उद्योजक आहेत; मात्र केवळ हीच त्यांची ओळख नाही, तर पंतप्रधान मोदी यांची भाषणं अनेक महत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणाऱ्या त्या एक दुवा आहेत. अतिशय उत्तम दुभाषी असलेल्या गुरदीप पंतप्रधानांच्या भाषणाचं भाषांतर करून त्या त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवतात. सध्या त्या अमेरिकेत असल्या, तरी त्या भारतीय असून त्यांचं शिक्षणही भारतातच झालंय. दिल्लीच्या स्टीफन्स महाविद्यालयातून इंग्रजी साहित्यात बीए ऑनर्स आणि एमए या पदव्या त्यांनी मिळवलेल्या आहेत. त्याशिवाय पॉलिटिकल सायन्समध्ये मास्टर्स पदवी मिळवून त्या पीएचडी झालेल्या आहेत. भारतीय संसदेकडून त्यांना प्रशिक्षण मिळालेलं आहे. त्याशिवाय कॅलिफोर्नियातलं ज्युडिशिअल कौन्सिल आणि अमेरिका स्टेट डिपार्टमेंटकडूनही त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे.