आताच्या घडीला राज्याच्या राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तयारी सुरू केली असली तर जागावाटपावरून आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहेत. दुसरीकडे ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्षही सातत्याने वाढताना दिसत आहे. यातच आता २२ आमदार शिंदे गट सोडण्याच्या तयारीत असून, ९ खासदारही संपर्कात असल्याचे मोठा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी हा मोठा दावा केला आहे. मीडियाशी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, शिंदे गटाचे २२ आमदार वैतागले आहेत. हे आमदार शिंदे गटातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत आणि १३ पैकी ९ खासदार आमच्या संपर्कात आहेत. खासदारही शिंदे गटाला वैतागले आहेत. कामे होत नाहीत. तुच्छतेची वागणूक मिळत आहे. इतर कुणालाही किंमत मिळत नाही, अशी तक्रार या आमदार आणि खासदारांची आहे, असा दावा विनायक राऊतांनी केला आहे.






