हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांसाठी एकाच टप्प्यात 5 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्याआधी भाजपला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसले आहेत. 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतरच हरियाणा भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर उमेदवारी न मिळाल्याने अनेक दिग्गज नेत्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तीन नेत्यांनी राजीनामे सादर केले आहेत.
आता हरियाणा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री कर्णदेव कंबोज यांनी राजीनामा दिला आहे. कर्णदेव कंबोज यांना उंद्री विधानसभेचे तिकीट हवे होते. उंद्री विधानसभेचे तिकीट नाकारल्याने कंबोज संतापले होते. पक्षाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला. त्याआधी दादरी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ भल्ले, रतिया येथील आमदार लक्ष्मण नापा भाजप युवा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि सोनीपत विधानसभा निवडणूक प्रभारी अमित जैन यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे.