दिल्ली : हरियाणामधील वीरेंद्र वर्मा यांनी आपली ‘एकता शक्ती पार्टी’ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयात वर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांनी वर्मा यांच्या पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेतला. दरम्यान, पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
हरियानाच्या राजकारणात विशेषतः कर्नाल जिल्ह्यात मराठा वीरेंद्र वर्मा हे चर्चेत असणारे राजकीय नेते आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारेवर प्रभावित होऊन वर्मा यांनी आपली एकता शक्ती पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन केली आहे. ही पार्टी आणि वर्मा यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यासाठी सोनिया दुहन यांनी डावपेच आखले होते. वीरेंद्र वर्मा यांच्या प्रवेशामुळे हरियाणा राष्ट्रवादी काँग्रेस आणखी मजबूत झाली आहे, असा दावा या वेळी उपस्थित वक्त्यांनी केला.