महायुतीमध्ये अजित पवार गटाची एन्ट्री झाल्याने भाजप नेत्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळेच अनेकजण बंडाच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. याबाबतच आता भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे.इंदापूर विधानसभेच्या जागेवरुन महायुतीमध्ये महाभारत पाहायला मिळत आहे. इंदापूर विधानसभेवर सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. मात्र या जागेवरुन भाजपचे बडे नेते हर्षवर्धन पाटीलही लढण्यास इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकांवेळी अजित पवार यांनी ही जागा भाजपला सोडण्याचा शब्द दिला आहे, असा दावा हर्षवर्धन पाटील करत आहेत. मात्र अजित पवार सातत्याने दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी जाहीर करत आहेत.
त्यामुळेच नाराज असलेले हर्षवर्धन पाटील हे बंडाच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपासून ते शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. अशातच आता हर्षवर्धन पाटलांनी एक महत्वाचे विधान केले आहे. एवढा पंधरावडा जाऊ द्या, मग मोठा निर्णय घेणार असं ते म्हणालेत. या विधानसभेला जनतेच्या मनामध्ये जे आहे, तोच निर्णय घेणार असे सूचक संकेतही हर्षवर्धन पाटील यांनी दिले आहेत.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. मागील महिन्यांमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची दोनवेळा भेट घेतली होती, तसेच दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली होती. त्यामुळेच हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता हर्षवर्धन पाटलांनी मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिल्याने अजित पवार गटासह दत्तात्रय भरणे यांचीही धाकधुक चांगलीच वाढली आहे. आता हर्षवर्धन पाटील नेमका कोणता निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.