राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही नेते पक्ष बदलाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अशातच राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे पक्षांतर करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे.
त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरू असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये बैठक पार पडली आहे. यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सूचक विधान केले आहे. “मी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे”, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गर्व्हनिंग कौन्सिलची बैठक दर ३ महिन्यांनी होते, आज ती बैठक झाली. आम्ही जेवढे सदस्य आहोत त्यांच्यात अडीच तीन तास बैठक झाली. शेतकऱ्यांसाठी काम करणारी ही मोठी संस्था आहे. या बैठकीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संबंधित विषयावर चर्चा झाली. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत. बरेच विषय होते, मधल्या काळात निवडणूक असल्याने अनेक विषय प्रलंबित होते. मराठवाड्यात जालना येथे जमीन घेऊन तिथे इन्सिट्यूटकडून संशोधनाचं काम सुरू आहे.
तसेच माझ्याशी राजकीय कुणी काही बोललं नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय बोलले हे माहिती नाही. माझ्याकडून अशी कुठलीही भूमिका इतर पक्षांत जाण्याची झालेली नाही. माझ्याशी कुणी संपर्क साधला नाही. सध्या अजित पवारांचे जे दौरे सुरू आहेत त्यात तालुक्याचा जो विद्यमान आमदार असेल त्यांना ती जागा मिळणार असं बोललं जातंय.
त्यामुळे साहजिकच आमच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो. लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि माझी अशी चर्चा झाली होती. त्यात अजितदादा म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस इंदापूरबाबतीत जो निर्णय घेतील तो मी मान्य करेन. त्यांनी भाषणातही असा उल्लेख केला होता. मलाही देवेंद्र फडणवीस मी इंदापूरबाबतीत निर्णय घेईन असं म्हटले आहेत. त्यामुळे मी वाट बघतोय की फडणवीस काय निर्णय घेतायेत असं हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.