लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला धक्का लक्षात घेता अनेक आमदार अस्वस्थ असल्याचं म्हटलं जातंय. असे असतानाच आता भाजपाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हेदेखील अस्वस्थ असल्याचं म्हटलं जातंय. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या सूचक विधानानंतर या चर्चेला आता बळ मिळाले आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे हर्षवर्धन पाटील अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा चालू आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनीदेखील सूचक विधान केले आहे.
हर्षवर्धन पाटील हे राज्याचे मोठे नेते आहेत. ते लवकरच योग्य निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय हा राज्याच्या हिताचा असेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. सुळे यांच्या या सूचक विधानानंतर आता इंदापूर मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.