*वाहनाचे ना निर्बंध दीवे*
दिवसेंदिवस रस्त्यावर धावणार्या वाहनांची संख्या वाढत्या प्रमाणात वाढत आहे. वाहन उत्पादक देखील आपल्या वाहनांची विक्री वाढावी यासाठी इच्छुकांची क्रयशक्ती जागृत करण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करतात. अर्थात त्यात काही चूक आहे असे नाही. उत्पादकांच्या उत्पन्नाबरोबरच नकळत राष्ट्रीय उत्पन्नात भरच पडत असते. एकदा वाहन विकले की, विक्रीयोत्तर सेवा पुरविण्यापलिकडे उत्पादकाला त्या वाहनाशी काही संबंध रहात नाही. निदान आजपर्यंतचा तो सार्वत्रिक अनुभव आहे. खरेदीदार त्या वाहनांमध्ये काय बदल करतो किंवा त्या वाहनाचे काय करतो याचेही उत्पादकाचा काही संबंध असतो का? याचा शोधच घ्यावा लागेल. मात्र कोणी आपल्या वाहनाची धाटणी, किंवा त्यातील तंत्रज्ञान किंवा विशिष्ट भाग वापरुन स्वतःच्या लाभासाठी काही करीत असेल तर अशा अवस्थेत उत्पादकांचे लक्ष तिकडे जातं. हे कधीतरी एखाद्या प्रकरणात दिसून येतं. याचा अर्थ उत्पादकाने आपल्या उत्पादनात वापरलेले सर्व आराखडे (डिझाइन) याबाबत आपले काही हक्क सुरक्षित करीत असावेत याला पुष्टी मिळते. विषय असा आहे की, अलिकडच्या काळात दुचाकी किंवा चारचाकी किंवा काही मोठ्या वाहनाचे दिवे, जे उत्पादकाने दिले ते बदलून चकाकणारे पांढरे दिवे वापरकर्ता वापरतो. अर्थात हा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून वापरकर्त्यांना करण्याची गरजच राहिली नाही. कारण उत्पादकच आपल्या वाहनांना असे दिवे लावूनच विक्रीसाठी उपलब्ध करतो. यामध्ये उत्पादकाचा हेतू ग्राहक संतुष्टी, ग्राहकांना आकर्षित करणे असा असू शकतो. एक समाधान हा ग्राहकाचा विषय. परंतू या चकाकणार्या पांढर्या दिव्याचा समोरुन येणार्या पांथस्थ किंवा दुचाकी वाहन धारकावर विपरीत परिणाम होतो. एक म्हणजे, त्याच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो. दुसरे म्हणजे, रस्ता दिसत नाही. दुभाजक किंवा बाजूपट्टी दिसत नाही. त्यामुळे रस्त्याच्या खाली वाहन उतरणे, दुभाजकावर चढणे, डोळ्यांना अंधारी येणे, गडबडून जाणे यासारखे प्रकार घडतात. याबाबत तक्रार कोठे, कशी करावी याविषयी प्रबोधन कोणी करीत नाही. शिवाय डोळे अंधारल्यामुळे वाहन नंबर किंवा वाहन ओळख करणे शक्य होत नाही. जर कोणी अशी तक्रार केलीच तर या दिव्यांची तीव्रता कशी मोजायची, डोळ्यांना त्रास होतो हे पुरावा म्हणून कसे सांगायचे, उत्पादकांना असे दिवे लावल्यास कशाच्या आधारावर कारवाई करायची? हा पोलीस प्रशासनासमोरचा प्रश्न. यावर काही उपाय नाहीच का? लोकांनी निमूट हा अन्याय नव्हे तर अत्याचार का सहन करायचा? याचे उत्तर कोण देणार? हा खरा प्रश्न आहे. या देशात या विषयसंबंधीत काही कायदा आहे का? नसेल तर का नाही?आहे तर त्याचा वापर का होत नाही? या कायद्याच्या सुरक्षेसाठी जबाबदारी कोणाची? यासारखे प्रश्न अनुत्तरित रहातात. मागे एकदा कधीतरी वाचनात आल्याप्रमाणे विल्सन कॉलेजचे भौतिक शास्त्राचे अध्यापक प्रा. महेश शेट्टी यांनी सांगितले होते की, असा प्रकाश मोजण्यासाठी लक्समीटर नावाचे उपकरण आहे. शिवाय मोबाईलवर या नावाचे अॅप देखील आहे. सोबत याचा खर्च देखील नगण्य आहे. या मार्गाने कोणत्या दिव्यामधून कीती प्रकाश बाहेर पडतो हे मोजता येते. कोणी आनंद इलेक्ट्रो मॅग्नेटिक चे प्रो. आनंद भावे यांनी असे म्हटले होते की, भारतात दिव्यांच्या प्रकाशासाठी कायदा आहे. काही देशांमध्ये वाहनांच्या दिव्यासाठी प्रकाश नियंत्रण देखील आहे. जर नगण्य खर्च करुन प्रकाश मोजता येत असेल, तसेच प्रकाश प्रखरतेसाठी कायदाही असेल तर आजपर्यंत त्याचा वापर करावा असे का घडले नाही? ज्याअर्थी कायदा आहे त्याअर्थी जबाबदारी निश्चिती देखील असली पाहिजे. जर हे सर्व खरे असेल तर संबंधीत विषयावर संबंधीत यंत्रणेने आजपर्यंत काय केले हे एकदा समोर आले पाहिजे. या कायद्याच्या सर्वश्रुतपणासाठी जाणिवेने प्रयत्न झाले पाहिजेत. यंत्रणा किंवा जबाबदार घटकांनी कोणाच्या तक्रारीची वाट न पहाताज्या वाहनांना असे दिवे असतील त्या वाहन उत्पादकावर कठोर कारवाई झाली पाहिजे. ज्या उपभोक्त्याने स्वतः दिवे बदलले असतील अशा धारकावर देखील जाणिवेने कारवाई व्हायला हवी. यामुळे निष्पाप लोकांवर होणारा अन्याय आणि अत्याचार यालातर पायबंद बसेलच, शिवाय भरधाव वा नात्याचा वेगालाही मर्यादा येऊन अपघातांची संख्या निश्चित कमी होण्यास मदतच होणार आहे. केवळ कायद्याने आपल्याला प्रतिबंध होत नाही यामुळे वाहन उत्पादक अधिक प्रखर, चकाकणारे, झगमगणारे दिवे लावण्याचे धारिष्ट करतात, याला आळा बसेल. कायद्याने आपल्याला बाधा येत नाही म्हणून आजचे दुर्लक्ष उद्या त्यांचा हक्क होणार नाही याची शाश्वती कोण देईल? हा प्रश्न आहे. जर यदाकदाचित अशा विषयासाठी कायदाच नसेल तर, अजून कोणाला या विषयाबाबत गंभीरता का आली नाही? हा देखील प्रश्न उलट या विषयावर अधिक गंभीरतेने संशोधन करून जास्तीत जास्त काम करण्याची गरज आहे. वाहन उत्पादकांची बेबंदशाही थांबली पाहिजे. कर्णकर्कश हॉर्न जसे नियंत्रणात आले तसेचप्रखर प्रकाश देखील नियंत्रणात आलाच पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी जनक्षोभ, लोकउद्रेक झालाच पाहिजे हा अट्टहास का असावा? वाहनांचे दिवे ना निर्बंध नाहीत याची शाश्वती संबंधीत यंत्रणा आणि जबाबदार घटकांकडून मिळाली तर ती पाहिजेच आहे.
साॅलोमन गायकवाड
ज्येष्ठ पत्रकार