Sunday, March 16, 2025

३ हजारांची लाच घेताना माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जाळ्यात

केज येथे मागील आठवड्यात तहसीलदार आणि कोतवाल यांच्यावर २० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ताजी असताना ट्रान्सफर सर्टिफिकेटच्या दुसऱ्या प्रतीसाठी ३ हजारांची लाच घेताना केज येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. ही कारवाई आज (दि.७) दुपारी शाळेच्या आवारात करण्यात आली.

या बाबतची माहिती अशी की, केज शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक धनराज सखाराम सोनवणे (रा. सारणी आनंदगाव, ता. केज) यांनी त्यांच्या शाळेतील एका माजी विद्यार्थ्याने १२ वी उत्तीर्ण झालेल्या टीसी ची द्वितीय प्रत मागणीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी मुख्याध्यापक धनराज सोनवणे यांनी त्यांच्याकडे ३ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर त्याने बीड येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानुसार मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा लावला. आज दुपारी लाचखोर मुख्याध्यापक हे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केज या शाळेच्या प्रवेशद्वारावर तक्रारदार विद्यार्थ्याकडून ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले.

ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी छत्रपती संभाजी नगरच्या लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, हनुमान गोरे, भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे, स्नेहलकुमार कोरडे यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles