अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. परिणामी काही भागातून थंडी गायब झाली असून तापमानात वाढ झाली आहे. अशातच येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ७२ तासांत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकणासह रायगड जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे.
दुसरीकडे धुळे, नंदुरबार येथेही रविवारपर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी, शनिवारी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली.यासोबतच सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवारी तुरळक पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.