अहमदनगर-जिल्ह्यात मान्सूनपूर्व आणि मान्सून दाखल झाल्यानंतर अनेक तालुक्यांत दमदार पावसाची नोंद झाली आहे. विशेष करून जिल्ह्याच्या दक्षिण भागात अनेक ठिकाणी मोठा पाऊस झालेला असून उत्तर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, संगमनेर आणि अकोले तालुक्याच्या काही भागात पेरणीसाठी अजून पावसाची गरज असून पुरेसा अथवा 100 मि.मी. पेक्षा जादा पाऊस झाल्यानंतर पेरणी करण्यात यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तर पारनेर, श्रीगोंदा, नेवासा, राहुरी, कर्जत, जामखेड, पाथर्डी तालुक्यांत पेरणीलायक पाऊस झाला असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, रविववारी जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद पाथर्डी तालुक्यातील करंजी आणि श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव महसूल मंडलात 112 मि.मी. झाली आहे. तर पारनेर मंडलात 105 मि.मी., वाडेगव्हाण 107 मि.मी., कोरडगाव 110 मि.मी., सलाबतपूर 100 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. यंदा नगर जिल्ह्यात बर्याच वर्षांनंतर पावसाने दमदार सुरूवात केली आहे. यामुळे अनेक ठिकाणी खरिपाच्या पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यंदा हवामान खात्याने चांगला पाऊस जाहीर केल्यानंतर शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाने दमदार सुरुवात केली आहे. जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला असून मान्सूनपूर्व पावसाने देखील दमदार हजेरी लावली आहे.