Monday, April 22, 2024

‘आबा, आज तुम्ही असते तर’… का नाही केले घाऊक पक्षांतर मुख्यमंत्री होण्यासाठी ?

‘आबा, आज तुम्ही असते तर’…
(~हेरंब कुलकर्णी)

आबा तुम्हाला जाऊन अवघी ८ वर्षे झाली..पण आज तुम्ही असता तर हे बघवले असते का ? तुम्ही ज्यांना देव मानले, त्यांना ते ही देव मानतात पण देवाचा जयजयकार करत त्यांनी देव्हारा बदलला….

ज्या राज्यात तुम्ही गृहमंत्री होता,
तिथे बोलताना शब्द चुकले म्हणून तुमचा राजीनामा घेतला गेला
आज नियत चुकली तरी सारे माफ आहे..

तुम्ही बदल्या करत होतात पण आज पोलीस दलातील बदल्यांचे रेट सर्वांचे पाठ झालेत
१०० कोटी रुपये गृहमंत्री घेतात याभोवती राजकारण झाले
पण हे खोटे असेल असे लोकांना वाटले नाही इतका स्तर घसरला आहे..

तुमच्यावर हा आरोप झाला असता तर आबा जनतेनेच तो उडवून लावला असता. ही तुमची ताकद होती आबा

५० खोके हा परवलीचा शब्द राज्याचा बनत असताना
तुम्ही आज दंतकथा वाटता आबा

प्रत्येक नेत्याने आपला एज्युकेशन मॉल उभारून कोट्यवधीची फी गोळा करताना जिल्हा परिषद शाळेत शिकणारी तुमची पोरे आठवतात आबा

तुम्हाला का नसेल वाटले ?
जमवावी कोटींची माया पुढच्या पिढीच्या राजकारणासाठी ?
तुम्ही का नाही केले घाऊक पक्षांतर मुख्यमंत्री होण्यासाठी ?

सशासारखे भाबडे डोळे तुमचे..कोणताही आरोप झाल्यावर स्पष्टीकरण देताना तुमची तगमग बघताना तुमचा आरपार निरागसपणा हलवून टाकायचा…

साखरसम्राट शिक्षणसम्राट दारू सम्राट आजूबाजूला असलेल्या राजकारणात
तुम्ही सत्वाची ‘पणती’ तशीच तेवत ठेवली…
आज कडेला संपत्ती चे हॅलोजन लॅम्प लागलेले असताना तुमची ज्योत तेजाने तेवत आहे आबा….

~ हेरंब कुलकर्णी

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles