अहमदनगर-शाळेत एकाच वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने वर्गातीलच अल्पवयीन विद्यार्थिनीला शस्त्राचा धाक दाखवून घरात बंद करुन लग्नासाठी धमकावले. हा प्रकार सोमवारी (ता. १०) सकाळी समोर आला. त्यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगळवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. शेवगाव-तिसगाव येथूनही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
कसबा विभागातील शिवाजी पुतळ्यापासून निषेध मोर्चाला सुरुवात झाली. पोलिस ठाण्यासमोर निषेध मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या भारती असलकर म्हणाल्या, की चार दिवसांपूर्वी आरोपी विद्यार्थ्याने शस्त्र दाखवून तिला धमकावले. मात्र, शाळा बंद होण्याच्या भीतीने तिने घरी हा प्रकार सांगितला नाही. सोमवारी (ता.१०) सकाळी पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने शिक्षकांना विचारून विद्यार्थिनी घरी निघाली. शाळेबाहेर तिला एक तरुणी भेटली. तिने तब्येत बरी नसल्याने मी तुझे दप्तर घेते, तू माझ्याबरोबर चल, असे म्हणत त्या विद्यार्थ्यांच्या घरी तिला नेले. तेथे आरोपीने घराचे दार बंद करून तब्बल तीन तास तिला कोंडून ठेवले. शस्त्राचा धाक दाखवून लग्नासाठी जबरदस्ती केली. विद्यार्थिनीने तेथून कसा तरी पळ काढून घर गाठले. घरच्यांना सगळा प्रकार सांगितला. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह मुलीच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तात्काळ हालचाली करीत संबंधित विद्यार्थ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशिरा विद्यार्थ्यांशी संबंधित एका महिलेने विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना धमकावल्याचे समजते.
भाजपचे अर्जुन धायतडक म्हणाले, की घरच्यांच्या संमतीशिवाय असा प्रकार होऊ शकत नाही. पोलिसांनी यात लक्ष न घातल्यास आम्ही आमचे संरक्षण करू शकतो. अॅड. प्रतीक खेडकर म्हणाले, की पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, यामध्ये सहभागी असणाऱ्या अन्य आरोपींचा शोध घेऊन कारवाई व्हावी. माजी नगरसेवक रामनाथ बंग, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, आतीश निराळी, रामदास बर्डे, शिवसेनेचे भगवान दराडे, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, सचिन वायकर, बन्सी मस्के आदींनी आक्रमक भूमिका मांडली. आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
कोणाचीही गय करणार नाही, पोलिसांचा इशारा