शिवसेना शिंदे गटाने काही दिवसांपूर्वीच लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. शिंदे गटाने एकूण आठ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. हिंगोलीमधून हेमंत पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर हेमंत पाटील यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू केला होता. मात्र आठवड्याभरातच आता हेमंत पाटील यांचे नाव मागे घेण्याची वेळ शिंदे गटावर आली आहे. त्यांच्याऐवजी आता बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे २६ एप्रिल रोजी हिंगोली मतदारसंघाचे मतदान पार पडणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची ४ एप्रिल ही शेवटची मुदत आहे. अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी ठरलेला उमेदवार मागे घ्यावा लागला आहे.