Saturday, May 25, 2024

विजय औटींचा विखेंना पाठिंबा, दिल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

नगर : लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खा. डॉ. सुजय विखे यांना पाठींबा देण्याच्या घोषणेचे बुमरँग माजी आमदार विजयराव औटी यांच्यावर उलटले आहे. तालुकाप्रमुखांसह पाचही पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी नगर येथे पत्रकार परीषद घेउन आम्ही महाविकास आघाडीसोबतच असल्याचे स्पष्ट करून विजय औटी यांच्या निर्णयाशी आम्ही सहमत नसल्याची घोषणा पत्रकार परीषदेत केली.

दोन दिवसांपूर्वी औटी यांनी तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, महिला आघाडीप्रमुख प्रियंका खिलारी, युवा सेना तालुका प्रमुख अनिल शेटे, ज्येष्ठ नेते मा. पंचायत समिती सदस्य डॉ. भास्कर शिरोळे, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्वांनी उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवारास मदत करण्याची भुमिका मांडली. त्यानंतर औटी यांनी आपण दोन दिवसांत निर्णय जाहिर करू असे स्पष्ट केले होते. बुधवारी रात्री औटी यांनी आपण सुजय विखे यांना पाठींबा देत असल्याचे सोशल मीडियावरून जाहिर केले. त्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.

औटी यांच्या निर्णयानंतर जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी तालुकाप्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून गुरूवारी नगर येथे त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीनंतर आ. नीलेश लंके यांनीही सेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधला.या बैठकीस तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे, महिला आघाडीप्रमुख प्रियंका खिलारी, युवा सेनेचे तालुकाप्रमुख अनिल शेटे, डॉ. भास्करराव शिरोळे, डॉ. कोमल भंडारी, किसन सुपेकर, किसन चौधरी, गुलाबराव नवले, सखाराम उजागरे, बाबाजी तनपुरे, संतोष येवले, शिवाजी लाळगे, डॉ. रायचंद आढाव, अशोक सालके, संजय मते, सुभाष भोसले, रामदास खोसे, संतोष साबळे, संतोष लामखडे, शांताराम पाडळे,शरद घोलप आदी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

निवडणूकीसंदर्भात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महाविकास आघाडीस पाठींबा देण्याबाबत सर्वच पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडली होती. मात्र औटी यांनी विखे यांना पाठींबा देण्याचा निर्णय परस्पर जाहिर केला. त्यांनी कशा पध्दतीने निर्णय घेतला किंवा त्यामागे त्यांची काय अडचण होती याचीही कल्पना नाही.

डॉ. श्रीकांत पठारे
तालुकाप्रमुख

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके हे तालुक्यातीलच आहेत. विधानसभेला शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात लढत झाली. त्यात लंके यांचा विजय झाला. तेंव्हापासून दोन्ही पक्षात संघर्ष सुरू होता. त्यासंदर्भात जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्याकडे भावना मांडल्या. यापुढील काळात कोणालाही त्रास होणार नाही, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समन्वयाने काम करतील अशी ग्वाही शशिकांत गाडे, दादाभाऊ कळमकर तसेच आ. नीलेश लंके यांनी दिली आहे. यापुढील काळात राष्ट्रवादी, शिवसेना एकदिलाने काम करतील. सर्व निवडणूका एकत्र लढवून सत्तेमध्ये वाटा दिला जाईल याची ग्वाही देण्यात आली असून आम्ही हातात हात घालून निवडणूकीस सामोरे जाणार आहोत असे डॉ. श्रीकांत पठारे यांनी सांगितले.

औटी यांनी परस्पर निर्णय कसा जाहिर केला या प्रश्‍नावर बोलताना डॉ. पठारे म्हणाले, पूर्वी औटी हेच निर्णय घेत असत. दोन पक्षांमधील संघर्षाबाबत वेळोवेळी औटी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. आज आम्ही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचाच आदेश मानणार असून महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार असल्याचे डॉ.श्रीकांत पठारे यांनी सांगितले.

औटी यांनी विरोधी उमेदवाराला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असून त्यांचा हा निर्णय पक्ष शिस्तीत बसणारा नाही. त्याबाबत पक्षाचे संपर्क प्रमुख सुनील शिदे यांना अहवाल पाठविण्यात आला असून तो अहवाल पक्षप्रमुखांपर्यंत गेल्यानंतर पुढील निर्णय जाहिर होईल.

शशिकांत गाडे
जिल्हाप्रमुख

विजय औटी यांनी बोलविलेल्या बैठकीस आम्ही उपस्थित होतो. सर्वांची भूमिका महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी ताकद उभी करण्याची होती. औटी यांनी घेतलेला निर्णय तमाम शिवसैनिकांना मान्य नसून तमाम शिवसैनिक महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे आहेत.

प्रियंका खिलारी
महिला आघाडी तालुकाप्रमुख

औटी यांचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाविरूध्द असून तो आम्हाला मान्य नाही. ज्या भाजपाने उध्दव ठाकरे यांना सर्वाधिक त्रास दिला त्या पक्षाच्या उमेदवाराला मदत करणे कडवट शिवसैनिक कधीही मान्य करणार नाही. औटी यांनी घेतलेला निर्णय आमच्या उपस्थितीत झालेला नाही. आमच्या स्वाभिमानाला धक्का लागेल असा हा निर्णय आहे. आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे आहोत.

अनिल शेटे
तालुकाप्रमुख, युवा सेना

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles