: गेल्या काही दिवसांपासून गृह मंत्रालयावरून महायुतीमध्ये वाद असल्याची, एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सूरू होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण देत शिंदे नाराज नसल्याचे सांगितले आहे. आठ दिवसांमध्ये आमचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेय. गृह खाते भाजपकडेच राहील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले आहेत.
गृहमंत्रालय आपल्याकडेच ठेवावे, असे भाजपला वाटत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट सांगितले. रिपोर्ट्सनुसार, एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रालयावर दावा ठोकला आहे, भाजपकडून गृह खाते देण्यास नकार देण्यात आलाय. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडलाय. भाजपकडून गृह खात्यावरील दावा सोडण्यास नकार देण्यात आलाय. एकनाथ शिंदे यांना दुसरे महत्त्वाचे खाते देण्यास भाजप तयार आहे, पण एकनाथ शिंदे गृह खात्यावर अडून बसल्याचे सांगितले जातेय.टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गृहखाते हवेच आहे. त्यासाठी ते आग्रही आहेत, या वृत्तावर भाजपने गृहमंत्रालयाकडेच ठेवावे, असे भाजपला वाटत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. फडणवीस म्हणाले की शिंदे यांनी अद्याप कोणत्याही खात्याबाबत आग्रह धरण्यात आलेला नाही. खातेवाटपावर आमची चर्चा सुरू आहे. खातेवाटपाचेच बोलायचं झालं तर गृह विभाग नेहमीच आमच्यासोबत आहे.
कोणत्याही पोर्टफोलिओसाठी (खाते) चर्चा आवश्यक आहे. परंतु काही पोर्टफोलिओवरील चर्चेसाठी विशेषकरून गृह विभाग नेहमीच आमच्याबरोबर आहे. महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत. गृह मंत्रालयाबाबत समन्वय आवश्यक आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महायुतीमध्ये चांगला समन्वय आहे. आमचे खातेवाटप, मंत्रिमंडळाची संख्या जवळपास निश्चित झाली आहे. १६ डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.