अंतरवाली सराटीमध्ये ड्रोनच्या घिरट्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. यासाठी त्यांनी आंदोलन देखील केले होते. आज विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानंतर जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली.
काँग्रेचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आजच्या कामकाजादरम्यान अंतरवाली सराटीचा मुद्दा मांडला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीमध्ये ड्रोन घिरट्या घालत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. यावर बोलताना गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती दिली.
‘याप्रकरणी पोलिस अधीक्षकांनी अहवाल दिला आहे. रात्रीचं ड्रोन सर्वेक्षण झालं आहे. त्याचे तीन पथकामार्फत चौकशी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवली आहे. ४ पोलिस आणि १ पोलिस वाहन जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत तैनात राहतील.’, अशी माहिती शंभुराजे देसाई यांनी दिली.
दरम्यान, यावर मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी सांगितले होते की, ‘मला मारणे एवढे सोपे नाही. माझ्या मागे राज्यातील ६ कोटी मराठा बांधव आहेत. जो कुणी ड्रोन उडवून हे काम करण्याचा प्रयत्न करतोय. त्याने आमच्या नादाला लागू नये. ड्रोन आले होते. ते खूपच उंचावर होतं. ड्रोन टप्प्यातच येत नाही. नाहीतर एका गोट्यातच त्याला खाली पाडणार.’, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता.