घरात लहान मुलं असतील, त्या बहुतांश घरातल्या भिंती पेन्सिलीने, खडू कलरने रंगवलेल्या असतात. कारण मुलं हमखास पेन्सिलीचा वापर करून भिंतीवर रेघोट्या मारतात. तो त्यांचा आवडता छंदच असतो. काही काही घरातली एकच भिंती तर काही काही घरातल्या सगळ्याच भिंती अशा रेघोट्यांनी खराब झालेल्या दिसतात. या रेघोट्यांमुळे संपूर्ण घराचंच पुन्हा रंगकाम करावं लागतं. तो तर मोठाच खर्चिक कार्यक्रम असतो. पण लगेचच एवढा मोठा खर्च करायचा नसेल तर त्याआधी हा एक घरगुती उपाय करून पाहा. उपाय housewife_to_homemaker या पेजवर शेअर करण्यात आला आहे.हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या रोजच्या वापरातला फक्त १ पदार्थ लागणार आहे. तो पदार्थ म्हणजे टुथपेस्ट.
सगळ्यात आधी तर मुलांनी भिंतीचा जो भाग केला आहे, त्या भागात थोडं पाणी लावून तो भाग ओलसर करा.यानंतर एक टुथब्रशवर थोडी टुथपेस्ट घ्या. ब्रशदेखील ओलसर करून घ्या. त्यानंतर त्या ब्रशने भिंतींवरच्या रेघोट्या घासून काढा. पेन्सिलीचे डाग असतील तर ते लगेच निघून जातील. पण क्रेयॉन रंगाचे डाग असतील तर एक- दोनदा हा उपाय करावा लागेल. भिंतीचा थोडा थोडा भाग घेऊन डाग काढायचा प्रयत्न करा. म्हणजे मग स्वच्छता करणे सोपे जाईल.