केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे वाशिमच्या दौऱ्यावर आहेत. वाशिमच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एका वक्तव्याने चर्चेत आले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाशिममध्ये आगामी लोकसभेवर मोठं भाष्य केलं. तसेच आगामी निवडणुकीत प्रचार कसा करणार, त्याबद्दलही त्यांनी सांगितलं.
केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वारंगा ते अकोला या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 च्या 3695 कोटी रुपयांच्या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. त्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
नितीन गडकरी म्हणाले, मी खोटं आश्वासन देत नाही, मी खोटं बोलत नाही, जे काही तोंडावर सांगतो. ४३ वर्षाच्या आयुष्यात मी जे काही बोललो, ते मी केले आहे. याबद्दल कोणीही पत्रकार मला म्हणू शकत नाही की, तुम्ही असे बोलले होते, ते तुम्ही केले नाही’.
पुढे म्हणाले की, येत्या लोकसभेत तर मी ठरवलं आहे की पोस्टर लावणार नाही, बॅनर लावणार नाही , चहा पाणी करणार नाही. ज्यांना मत द्यायचे आहे, त्यांनी द्या. नसेल तर नका देऊ, असे म्हणत राजकारणात खोटे बोलण्याची काही गरज नाही, असे त्यांनी सांगीतले.