Saturday, March 22, 2025

नगर जिल्ह्यात प्रथमच सापडले मानवी शिल्प, अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे सापडले पुरावे

अहमदनगर- अश्मयुगीन मानव म्हटलं की नजरेसमोर येतं ते इयत्ता तिसरीच पुस्तक ‘ माणसाची गोष्ट’ हा मानव कसा होता ? काय खात होता? हे या पुस्तकातूनच आपण शिकलो. अशाच एका अश्मयुगीन ठिकाणाचा शोध नुकताच इतिहास अभ्यासक सतीश भिमराव सोनवणे यांनी लावला. हे ठिकाण कामरगाव जवळच्या ‘ मावलया डोंगरावर’ सापडले आहे.
कामरगाव नगर तालुक्यातील गाव. या गावाच्या भोवती सह्याद्रीची एक तुटक रांग आहे. यातील विठ्ठलवाडी कडून अस्तगावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर नगर पुणे महामार्ग पासून साधारणतः३ किमी अंतरावर एका टेकडीला मावलयाचा डोंगर म्हणतात. या ठिकाणाला सोनवणे यांनी दि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी भेट दिली होती . या डोंगरावर काही उभ्या शिळा ठेवलेल्या आहेत आणि एका बाजूला मध्ययुगीन काळातील कोणतीही मूर्ती नसलेले बांधकाम आहे. याचा बारकाईने अभ्यास केला असता ही वेगळीच रचना असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार अभ्यास सुरू केला. इतिहास अभ्यासक प्रा. टी. मुरुगेश यांच्या मता नुसार हे इतिहास पूर्व कालीन थडगे असावे. ज्याचा संबंध मातृ देवतेशी असतो. त्यानुसार आणखी निरिक्षण करण्यासाठी दुसऱ्यांदा दिनांक १० मार्च २०२४ रोजी त्यांनी पुन्हा भेट दिली. यावेळी त्यांना काही पुरावे सापडले . त्यात सात उभ्या शिळा होत्या , यांची मावलया नावाने पूजा केली जात आहे. या शिळांचा आकार वेग वेगळा असून त्यावर स्थानिक लोकांनी शेंदूर लावला आहे.
सर्वात महत्त्वाचा पुरावा -मानवी प्रतिमा असलेली शिळा (कातळ शिल्प )- यातील एका शिळेवर एका चार पायांच्या प्राण्यावर बसलेल्या मानवाचे चित्र दगडावर कोरलेले आहे. चित्राची उंची साधारणतः २० सेमी आहे व रुंदी १५ सेमी. ज्या प्राण्यावर माणूस बसलेला आहे त्याची मान उंच आहे यावरून तो घोडा किंवा उंट असावा असा अंदाज आहे .
यातील माणूस वारली चित्रा प्रमाणे भासतो. डोके वर्तुळाकृती छाती आणि पोटांच्या जागी दोन त्रिकोण अशी रचना आहे.
कोकणातील काळ्या कातळावर कोरलेले हे शिल्प दख्खनच्या पठारावर नव्याने सापडत आहेत . या शिल्पातील व्यक्ती प्राण्यावर बसलेली आहे म्हणजे ते एका वीराचे शिल्प असले पाहिजे. या परिसरात सात अप्सरांचे अस्तित्व आहे असे स्थानिक सांगतात. याचा संबंध सप्तमातृकांशी येतो. यावरुन कदाचित ही वीरांगना सुद्धा असू शकते.
या परिसरात काही अश्मयुगीन दगडी हत्यारे सुध्दा सापडली आहेत. याबरोबरच अश्मयुगीन राखेची टेकडीही परिसरात सापडली आहे.
दख्खनच्या पठारावरील काळ्या कातळावरील शिल्पावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करणारे सचिन पाटील यांच्या मता नुसार कठीण बेसाल्ट खडकावर असे शिल्प नव्याने सापडत आहेत. याशोधा साठी त्यांनी सतीश सोनवणे यांचे अभिनंदन केले आहे. राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांना याबद्दल ई मेल द्वारे कळविण्यात आले आहे. या संदर्भात अधिक संशोधन करत असल्याचे सतीश सोनवणे यांनी सांगितले .या संशोधनास निवृत्त प्रा. एम
एन आंधळे , विक्रांत मंडपे , अर्जुन खाडे, प्रशांत साठे यांनी मोलाची मदत केली.

नगर तालुक्यातील कामरगाव येथील मावलया नावाच्या डोंगरावर पुरातन काळातील शिल्प व काही शिळा सापडल्या आहेत . इतिहास अभ्यासकांच्या मतानुसार या परिसरात नवाश्मयुगातील मानवाचे अस्तित्व होते . याचे सखोल संशोधन झाल्यास महत्त्वाची ऐतिहासीक माहिती व पुरावे मिळू शकतील . त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत . “— सतीश सोनवणे ( इतिहास अभ्यासक , कामरगाव )

” दख्खनच्या पठारावर काळया कातळावर शिल्प कोरलेले पुरावे नव्याने सापडत आहेत . नगर जिल्ह्यात मात्र प्रथमच असे शिल्प सापडले आहे . सापडलेल्या पुराव्याचे पुरातत्त्व विभागाच्या मार्फत संशोधन केले जाईल . यातुन काही ऐतिहासिक माहिती समोर येईल . ” — सचिन पाटील ( काळ्या कातळ्यावरील शिल्पाचे आतंरराष्ट्रीय अभ्यासक , पुणे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles