अहमदनगर सतत होत असलेल्या भांडणातून पतीने पत्नीला बेदम मारहाण करून जागीच ठार केल्याची घटना आज गुरूवार दि. 3 ऑक्टोबर 2024 रोजी मध्य रात्रीच्या सुमारास राहुरी शहरातील येवले आखाडा येथे घडली आहे. घटनेनंतर आरोपी पती हा स्वतः हून पोलिस ठाण्यात हजर झाला असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेतील मयत उर्मिला केशव लगे (वय 35) या आरोपी पती केशव श्रीराम लगे, दोन मुलं, सासु, सासरे असे सर्वजण राहुरी शहरातील येवले आखाडा परिसरात राहत होते. मयत पत्नी व आरोपी पती दोघांमध्ये कायमच शुल्लक कारणावरून वाद होत होते.
दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी रात्रीच्या दरम्यान पतीने पत्नीशी वाद केला. त्यावेळी घरातील काही लोकांनी दोघांची समजूत काढून वाद मिटवले होते. त्यानंतर मयत व आरोपी दोघे पती पत्नी त्यांच्या खोलीमध्ये झोपी गेले. रात्री बारा वाजे नंतर दोघा पती पत्नीमध्ये पुन्हा वाद सुरु झाला. मात्र त्यावेळी दोघांचा वाद अगदीच विकोपाला गेला. आणि आरोपी पतीने लोखंडी रॉडने हाथ, पाय व डोक्यावर बेदम मारहाण करून पत्नीची निर्घृण हत्या केली. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यानंतर आरोपी पती पहाटे साडेपाच वाजे दरम्यान राहुरी पोलिस ठाण्यात हजर झाला आणि माझ्या पत्नीला कोणीतरी मारुन टाकले, अशी माहीती दिली.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, संदीप परदेशी, अमोल पवार, पोलिस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, धर्मराज पाटील, हवालदार सुरज गायकवाड प्रमोद ढाकणे संतोष राठोड, गणेश लिपने, नदीम शेख, रवींद्र पवार, गोवर्धन कदम, सतिष कुर्हाडे, अंकुश भोसले तसेच अहमदनगर येथील ठसे तज्ञ आदि पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिस पथकाने मयत पत्नीचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर ठसे तज्ञांनी घटनास्थळी ठसे मिळवीले. परंतू, पोलिस पथकाला संशय आल्याने त्यांनी आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा केल्याची कबूली दिली.
दुपारी वैद्यकीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी मयत महिलेचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेबाबत मयत महिलेच्या भाऊ मयुर कचरु गाडेकर (रा. माळी चिंचोरा ता. नेवासा) यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी पती केशव श्रीराम लगे (रा. येवले आखाडा, राहुरी) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलिस करीत आहेत.