आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांचे एकेक प्रताप समोर येऊ लागले आहेत. पूजा खेडकर यांनी युपीएससी परीक्षा क्रॅक करण्यासाठी आणि आयएएस बनण्यासाठी काय काय उद्योग केले ते समोर येत आहेत. खेडकर यांनी वायसीएम रुग्णालयातून ऑगस्ट २०२२ मध्ये ७ टक्के अस्थिव्यंग असल्याचे प्रमाणपत्र घेतले आहे. अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून २०१८ मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि २०२० मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र घेतले आहे.
जा हिने युपीएससीतील सर्व प्रयत्न संपल्यानंतर नाव बदलून पुन्हा परीक्षा दिल्याचे देखील समोर आले आहे. तसेच अर्जांमध्ये वयही वेगवेगळे लिहिल्याचे समोर आले आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी ११ वेळा परीक्षा दिल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
पूजा यांनी ‘खेडकर पूजा दिलीपराव’ या नावाने २०२०-२१ पर्यंत परीक्षा दिली. त्यानंतर २०२१-२२ मध्ये त्यांनी ‘पूजा मनोरमा दिलीप खेडकर’, असे नाव बदलून प्रयत्न संपल्यानंतरही दोन वेळा परीक्षा दिली.
याहून धक्कादायक म्हणजे पूजा यांचे वय तीन वर्षांत फक्त एका वर्षांनेच वाढले आहे. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार पूजा यांनी २०२० मध्ये खेडकर पूजा दिलीपराव या नावाने परीक्षा देताना वय ३० वर्षे दाखविले होते. तर २०२३ मध्ये पूजा मनोरमा दिलीप खेडकर असे नाव बदलून परीक्षा देताना वय ३१ वर्षे दाखविले होते.
यावर प्रतिक्रिया देताना पूजा यांनी ”माझ्यासोबत काय होत आहे, हे स्पष्ट दिसत आहे. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत कोणीही दोषी ठरत नाही. मीडिया ट्रायलद्वारे मला दोषी ठरविणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.