वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला मानसिक छळ केल्याची तक्रार पूजा खेडकरांनी केली आहे. पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी असताना हा छळ झाल्याची तक्रार पूजा खेडकरांनी केली आहे.
पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि इतर काही अधिकाऱ्यांच्या विरोधात छळवणूक केल्याची तक्रार केली आहे. खेडकरांची ही तक्रार सामान्य विभागाकडे वर्ग करण्यात आली असून वरिष्ठ अधिकारी त्यावर कारवाई करतील.
पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असून पुण्यामधील त्यांची छोटीशी कारकिर्द वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यांनी केलेल्या अवास्तव मागण्यांनंतर पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांची तक्रार राज्य शासनाकडे केली होती. त्यानंतर पूजा खेडकर यांची बदली वाशिममध्ये करण्यात आली.
पुण्यामध्ये असताना निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे चेंबर बळकावल्याचा आणि खासगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावून फिरल्याचा आरोप पूजा खेडकरांवर करण्यात आला. तसेच एक प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना पूजा खेडकरांनी कार्यालय, शिपाई अशा अवास्तव मागण्या केल्याची तक्रार करण्यात आली आहे.