अहमदनगर: राज्यासह देशभरात गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत आलेली ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या दिव्यांग प्रमाणपत्रबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्याबाबत आता महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती आहे. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आली असून जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पूजा खेडकरला डोळे आणि मानसिक आजाराचे एकत्रित प्रमाणपत्र 2021 मध्ये दिल्याची माहिती आहे. तसेच तत्कालीन वैद्यकीय मंडळांना हे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती देण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयाचे दस्तावेज तपासले असता त्यात या नोंदी आढळल्या असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी सांगितले आहेत.
पूजा खेडकरने UPSC नागरी सेवा परीक्षेत पात्र होण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्रासोबतच नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र देखील जोडलो होते. पण पूजाच्या ओबीसी नॉन क्रीमिलीयर कँडिडेट असण्यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उमेदवाराच्या वडिलांची संपत्ती 40 कोटी रुपये असेल तर त्यांच्या पाल्याचा ओबीसी नॉन क्रीमी लेयरमध्ये कसं गृहीत धरलं जाईल? असा सवाल उपस्थित होत आहे.
त्याचबरोबर लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत खोट्या प्रमाणपत्राद्वारे तिने हे पद मिळवल्याचा दावा करण्यात येत आहे. दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा करत पूजा खेडकर आयएएस झाली. त्यासाठी तिला सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलवले होते. परंतु सहा वेळा ती हजर राहिली नाही. त्याऐवजी बाहेरुन वैद्यकीय अहवाल दिला, त्यामुळे वाद निर्माण झाला होता.