नाशिक -विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा महापालिका निवडणुकीकडे लागल्या आहेत. तर दुसरीकडे मनपा आयुक्तांचीदेखील बदली होण्याची चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे आपल्या शिस्तीमुळे कायम चर्चेत राहणारे अधिकारी तुकाराम मुंढे नवीन वर्षात मनपा आयुक्त म्हणून येणार असल्याची चर्चा सोशल मीडियात सुरू आहे.मुंढे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रामाणिक, शिस्तप्रिय व कर्तव्यनिष्ठ आधिकारी आहेत. सध्या सोशल मीडियावर माजी मनपा आयुक्त मुंढे नव्या वर्षात पदभार स्वीकारतील, असे मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामुळे मनपा वर्तुळात त्यांच्या येण्याच्या बातम्यांमुळे काहींची डोकेदुखी वाढली आहे. विविध व्हॉटस्अॅप ग्रुपवर मुंढे यांचा फोटो वापरून मेसेज पसरत आहेत.
दरम्यान, विद्यमान आयुक्त डॉ. अशोक करंजकर विविध कारणांनी वादग्रस्त ठरले आहेत. रात्रीतून भूसंपादाचा सुमारे ५५ कोटींचा धनादेश देण्याची घटना असो की सुमारे २०० कोटींच्या सफाई ठेक्यासाठी रात्रीतून काढलेली निविदा, त्यामुळे त्यांच्या बदलीची कायम चर्चा असते. मात्र यंदा मुंढे येणार असल्याचे संदेश फिरत असल्याने मनपात काहींना चांगलाच ताप झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, याबाबत अधिकृत माहिती कोणी देत नाही.