शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शिंदे गटात जल्लोष सुरू आहे. त्यातच या निकालावर भाष्य करताना हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेले एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे. मोदी पंतप्रधान न झाल्यास मी फाशी घेईन असं धक्कादायक विधान बांगर यांनी केले आहे.
हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर हे सातत्याने त्यांच्या विधानांसाठी चर्चेत असतात. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर संतोष बांगर म्हणाले की, आज सर्वसामान्यांच्या घरात लोकांना माहिती आहे आपल्याला शिवेसना-भाजपालाच निवडून द्यायचे आहे. मी निकाल आमच्याच बाजूने लागणार हे सांगितले होते. २०२४ ला ठामपणे छाती ठोकून सांगतो येणाऱ्या एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक आहे. या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच पुन्हा येणार आहे. जर मोदी पंतप्रधान झाले नाही तर मी भरचौकात फाशी घेईन. या देशात मोदीच पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाहीत असं त्यांनी सांगितले.