अवैध सावकारी व्यवहाराबाबत ३० सप्टेंबरपर्यंत म्हणणे मांडण्याचे आवाहन
अहमदनगर दि.२३ – तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील पोपट कोकाटे यांच्यासोबत अवैध सावकारीतून व्यवहार झाले असल्यास संबंधितांनी त्याबाबतच्या पुराव्यासह ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत आपले म्हणणे मांडण्याचे आवाहन उपनिबंधक सहकारी संस्था शुभांगी गोंड यांनी केले आहे.
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अन्वये उपनिबंधक सहकारी संस्था, अहमदनगर यांच्या कार्यालयाच्या नियुक्त पथकाने पोपट गजानन कोकाटे यांच्या राहत्या घरी ५ सप्टेंबर, २०२४ रोजी घरझडती घेतली. या झडतीमध्ये पथकास कागदपत्र व नोंदीची रजिस्टर आढळून आले. नोंदीच्या रजिस्टरमध्ये बऱ्याच व्यक्तींची नावे आढळून आली आहेत. नमूद व्यक्तींची नावे व पत्ते उपलब्ध नसल्याने त्यांना म्हणणे मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.