Home नगर जिल्हा हिवाळ्यात पावसाळा! पुढील २४ तासांमध्ये ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस

हिवाळ्यात पावसाळा! पुढील २४ तासांमध्ये ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस

0

महाराष्ट्रातील नागरिक सध्या हिवाळ्यामध्ये पावसाळ्याचा अनुभव घेताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. फेंगल चक्रीवादळाचा सर्वात जास्त परिणाम कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर झाला आहे. अति थंडी आणि आता पाऊस यामुळे शेतपिकांचे नुकसान होत असून बळीराजा संकटात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील ७ जिल्ह्यांना ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. फेंगल चक्रीवादळ शांत होत नाही तोच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पुन्हा वार्‍याचा वेग वाढल्यामुळे ४ ते ७ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्वच भागांना पावसाचा इशारा दिला आहे.

ढगाळ वातावरणामुळे राज्यातील किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने काल दिवसभर उकाडा जाणवत होता. आज देखील अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी पुढील २४ तासांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढच्या ४८ तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमधील थंडी कमी झाली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरडं आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. राज्यात थंडी कमी झाली असून आता उकाडा जाणवायला लागला आहे.